Tuesday, February 14, 2017

माझी अमेरीका ट्रिप - काही आठवणी

२०१६ साली माझा धाकटा मुलगा प्रसन्न ह्याच्याकडे अमेरिकेत जायचा योग आला. अडीच तीन महिन्याच्या ह्या वास्तव्यातील काही आठवणी ह्या ब्लॉगमध्ये लिहून ठेवायचा प्रयत्न केलाय. एकच लेख लिहिला असता तर कंटाळवाणा झाला असता, म्हणून विषय वेगवेगळे करून एकूण १२ पानात वाटून लिहिले आहेत.

खाली दिलेल्या लिंक्सना क्लिक केले की ते ते पान उघडेल.

धन्यवाद,
जयंत देशपांडे




४ - वन वर्ल्ड ट्रेंड सेन्टर आणि न्यूयॉर्क सिटी

५ - न्यूयॉर्क क्रूझ टूर, ग्रँड सेंट्रल टर्मिनल,अॅपल स्टोअर

६ - मॅडम तुस्साड्स वॅक्स म्युझियम, चायना टाऊन न्यूयॉर्क

७ - जॉर्जिया अॅक्वेरियम, अॅटलांटा

८ - हेलेन आणि अॅना रुबी फॉल्स

९ - ऑलिम्पिक स्टेडियम आणि अन्य, अॅटलांटा

१० - पार्क्स आणि ट्रेल्स

११ - मॉल्स आणि मार्केट्स

१२ - भारतीय समुदायाचे आदरातिथ्य आणि बाय बाय अमेरीका




Sunday, February 12, 2017

१ - पुण्याहून प्रस्थान आणि अमेरिकेत आगमन

बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहायला बसलो. अमेरिकेतून आल्यावर बरीच कामे होती, त्यासाठी काही दिवस ठाणे पुणे झाले. त्यानंतर ट्रिपचा फोटो अल्बम तयार केला. मग लक्षात आले की अरे आपला ब्लॉग आहे, अमेरिकेत लिहायला सुरुवात केली होती, पण फिरायच्या नादात लिहायचे राहूनच गेले. आता बसलोय परत लिहायला.

आई बाबा इकडे कधी येताय विचारून विचारून चिरंजीव कंटाळले होते. शेवटी एक दिवस त्यानेच अमेरिकन व्हिसासाठी अॅपॉइण्ट्मेण्ट घेतली. सोमवारची अॅपॉइण्ट्मेण्ट मिळाली होती, आणि गुरुवारी संध्याकाळी त्याने मला तसे सांगितले, मग काय, झाली पळापळ सुरु. त्याने त्याचे पेपर्स पाठवले. व्हिसासाठी काय काय लागते त्याची माहिती सांगणाऱ्या सगळ्या लिंक्स आधी पाठवल्या होत्या, त्या नीट पहिल्या. दोन दिवसात माझे आणि सुजाताचे सगळे पेपर्स शोधून, त्यांच्या झेरॉक्स कॉपीज काढून वेगवेगळे सेट्स तयार केले. आणि रविवारी ठाण्याला गेलो. अमेरिकन एम्बॅसिचे खरेच कौतुक करायला पाहीजे. ९.३० वाजताची अॅपाॅइण्ट्मेण्ट होती, आम्ही  काम संपवून १० वाजता ठाण्याला  घरी पोचलो पण होतो. सर्व काही एकदम वेळेत आणि शिस्तीत. दुसरी अॅपॉइण्ट्मेण्ट चार दिवासानंतरची होती. तेव्हा पण  ८ वाजताची अॅपॉइण्ट्मेण्ट होती. आम्ही ७ वाजता एम्बॅसीबाहेर होतो, बरोबर ८ वाजता आत सोडले. कुठे काही कटकट नाही, थोडे फार प्रश्न विचारून "काँग्रॅच्युलेशन्स, युवर व्हिसा इज अॅप्रुव्हड" म्हणून सोडून दिले. परत ९.३० वाजता घरी. प्रसन्नला तसे कळवल्याबरोबर त्याने लगेच  तिकीट पण काढून टाकले आणि ह्या तारखेला माझ्याकडे या असे फर्मान सोडले. आम्हाला काय पुण्यात आपल्या घरी, ठाण्यात मोठ्या मुलाच्या घरी, तसे अमेरिकेत धाकट्या मुलाच्या घरी. पुण्यात पुष्कर विमानतळावर सोडायला आला होता,  लुफ्थान्साच्या विमानात बसलो आणि दुसऱ्या दिवशी अमेरिकेत. अॅटलांटाला प्रसन्न आणि दिपाली घ्यायला आलेले. कुठेही काहीही कटकट नाही, आरामात पोचलो.

पुणे विमानतळावर

पुण्याच्या विमानतळावर फारशी गर्दी पण नव्हती. बहुधा उड्डाण घेणारे आमचे शेवटचे विमान असावे. कस्टम चेक इन लगेचच झाले. उगाचच बाऊ करून ठेवला होता की खूप कटकट असते. माझे उरलेले पांढरे केस बघून म्हणा, किंवा सुजाताला गुडघे दुखत असल्यामुळे लंगडताना पाहीले म्हणून असेल, बोर्डींगसाठी रांगेत उभे न करता आम्हाला सरळ विमानात बसवले. तशी व्हीलचेअरची सोय प्रसन्नने करून ठेवली होती, पण उगाच कशाला म्हणून आम्ही ती घेण्याचे टाळले. खरं तर व्हील चेअर म्हणजे खूप आजारी असल्यासारखे वाटते, मी हॉस्पिटलला असताना देखील व्हील चेअर नको म्हणत होतो, पण तिथल्या डॉक्टरने ऐकले नव्हते.

पुढे फ्रँकफर्ट विमानतळावर विमान बदलण्यासाठी उतरलो. अबब, केवढा हा विमानतळ, विमानातून उतरल्यापासून बाहेर गेटपर्यंत यायला बसने पंधरा मिनिटे लागली असतील. ह्या गेटपासून पुढच्या बोर्डिंग गेटपर्यंत सुद्धा दहा मिनिटे लागली, तेही लुफ्थान्साच्या कार्टने गेलो म्हणून. तरी टर्मिनल एकच होते. फ्र्ँकफर्ट विमानतळावर पुढची फ्लाईट एका तासातच होती. मग मुकाटपणे व्हीलचेअरची मागणी केली. तिथल्या स्टाफला सांगितले की वेळ कमी आहे लवकर सोडा. पण ते बिनधास्त होते. आम्हाला कुठेही रांगेत उभे न करता, कस्टम चेक इन करून, त्यांच्या कार्टने डायरेक्ट पुढच्या बोर्डिंग गेटजवळ सोडले. केवढा प्रचंड मोठा विमानतळ. विमानतळ म्हणायचा की शॉपिंग मॉल, दोन्ही बाजुंनी झगझगीत दुकाने. बोर्डिंग काउण्टर पण एका कोपऱ्यात. सिनेमाची तिकिटे काढायला असते तशीच आणि तेवढीच रांग, बाकी आजुबाजुला दुकानेच दुकाने. तिथे पण व्हीलचेअरकृपेमुळे रांगेत ऊभे न राहता सरळ बोर्डिंगच्या बसमध्ये बसलो. विमानात बोर्ड होणारे पहिले प्रवासी आम्हीच. नाहीतरी पुण्यापासून अखंड ८-९ तास विमानात बसून पाय आणि गुडघे अस्तित्व दाखवायला लागलेच होते. बरं झालं, रांग वाचली.

पुढचे विमान थोडे मोठे होते. जेवणसुद्धा पहिल्यापेक्षा चांगले होते. पहिल्या विमानात  भारतीय आणि जर्मन लोक होते, इथे आमच्यासारखे काही नगण्य सोडले तर सगळेच एकतर लालबुंद गोरे, किंवा पूर्ण काळेकुट्ट, पण स्मार्ट आणि तरतरीत. विमानाचा स्टेटस दाखवणारे स्क्रीन प्रत्येकाच्या समोर होते. एक लांबलचक डुलकी झाल्यावर, पुढचा बराचसा वेळ खाण्यापिण्यात आणि विमान कुठे आहे आणि पोचायला अजून किती वेळ राहीला हे पाहण्यातच गेले.

आणि शेवटी एकदाचे अमेरिकन विमानतळावर उतरलो. विमानात अमेरिकेच्या कस्टमचा एक फॉर्म सगळ्यांना दिला होता. आमचा तो भरून तयार होता. पण इथे अॅटलांटा विमानतळावर  इलेक्ट्रॉनिक सिस्टीम होती. त्यावरच सर्व माहीती भरून कस्टम चेकईनला गेलो. चार पाच जुजबी प्रश्न विचारून आमच्या पासपोर्टवर एन्ट्रीचा शिक्का बसला आणि आम्ही मोकळे झालो. पुढे ग्रीनबेल्ट मधून सामान चेक करून बाहेर पडलो तो समोर प्रसन्न आणि दिपाली घ्यायला आलेच होते. हुश्श, संपला बाबा एवढा मोठा प्रवास. आम्हाला आणि आमच्या सामानाला त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या गाडीत बसून घरी जायला निघालो.

प्रसन्नच्या कॅमरीतून

प्रसन्नच्या गाडीतून विमानतळाबाहेर पडलो. अरे बापरे, केव्हढे मोठे रस्ते, केव्हढे ते फ्लायओव्हर्स. प्रचंड ट्रॅफिक पण अत्यंत शिस्तीत चालला होता. कुठे घुसाघुशी नाही, भसकन ट्रॅक बदलणे नाही, दोन गाड्यांमध्ये भरपूर अंतर. आपल्याकडे एव्हढे अंतर ठेवून गाडी थांबवली तर लगेच दोन रिक्षा आणि चार मोटारसायकली घुसणारच. अॅटलांटा शहराबाहेर आलो तेव्हा पण एव्हढे मोठे रस्ते, आणि दुतर्फा सर्व हिरवेगार. प्रसन्नच्या मिल्टन शहरापर्यंत असेच प्रसन्न रस्ते. हायवे सोडून मिल्टन शहरात शिरल्यावर तर अगदी हिल स्टेशनसारखे वातावरण. शहरातले रस्ते आपल्या एक्स्प्रेसवे एव्हढे. छोट्यातला छोटा रस्ता जंगली महाराज रस्त्याएवढा. दोन्ही बाजूंनी फूटपाथवर वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला हिरवळ, छोटे छोटे बुशेस, रंगीबिरंगी फुलझाडे. फूटपाथच्या पलीकडे हिरवीगार झाडे, त्याच्या पलीकडे सुंदर बंगलेवजा घरे, ऑफिसेसच्या इमारती किंवा बैठे मॉल्स. मोठे मोठे चौक, सिग्नल न मोडता चालणाऱ्या भारी भारी गाड्या. आणि सिग्नल नसेल तिथे पण अविश्वसनीय शिस्त. 

स्वच्छ आणि सुंदर रस्ते

अविश्वसनीय वाहतूक शिस्त

एका चौकात सिग्नल नव्हता आणि आम्हाला सरळ जायचे होते. पुढची गाडी चौकात थांबली, प्रसन्नने पण मागे गाडी थांबवली. चारही रस्त्यांवर गाड्या थांबल्या होत्या. एका मिनिटात पुढची गाडी रस्ता क्रॉस करून पुढे गेली, आणि प्रसन्नने गाडी थोडी पुढे घेऊन परत थांबवली. मी त्याला म्हणालो, अरे दुसरी गाडी घुसण्याआधी पटकन चल, तो हसला आणि म्हणाला बाबा, इथे असे चालत नाही. आपल्या पुढचा गेला ना, आता बाकी तिन्ही रस्त्यांवरच्या एकएक गाड्या गेल्या कि मग आपण जायचे. आणि खरंच, बाकी रस्त्यांवरच्या एकएकच गाड्या गेल्या, आणि मग आम्ही शिस्तीत आमचा नंबर आल्यावर पुढे गेलो. आपल्या इथे असे थांबलो तर पाठीमागून पॉमपॉम सुरु होईलच, परत लोकं शिव्या पण देतील काय येड्यासारखा गाडी थांबवतोय म्हणून. 

आणि शेवटी प्रसन्नचे घर आले. त्याच्या कम्युनिटीच्या गेटमधून त्याने गाडी आत घेतली तेंव्हा समजलेच नाही की आपण एखाद्या रेसिडेन्शल सोसायटीत शिरलोय म्हणून. काय तो एंट्रन्स गेट. गेटच्या बाहेर सुंदर फुलझाडे, डिव्हायडरवर लॉन. आत दोन्ही बाजूंना उंच उंच हिरवीगार झाडे, ती सुद्धा साधारण एकाच उंचीची. थोडे पुढे गेल्यावर कम्युनिटीचा स्विमिंग पूल. त्याच्यानंतर मग एकएक बंगलेवजा घरे सुरु झाली. कम्युनिटीच्या आतल्या रस्त्यांना पण नावे. मेन रोड फ्लेमिंगो रोड, आणि आमच्या घरासमोरचा कॅनरी लेन. प्रत्येक घरासमोर  हिरवळ, एकएक छोटे झाड, आणि काही फुलझाडे. सगळे छोटे छोटे दुमजली  किंवा तिमजली बंगले. एकही उंच इमारत नाही. 

कम्युनिटी गेटजवळ

कम्युनिटीचा स्वतःचा स्विमिंग पूल

सुंदर अंतर्गत रस्ता

कम्युनिटीतील घरे

आणि फायनली मोस्ट अवेटेड प्रसन्न-दिपालीच्या घरी पोचलो. गाडीत बसूनच त्याने गॅरेजचे गेट रिमोटने उघडले. आम्हाला हे नविन होते, त्यामुळे नवल आणि कौतुक वाटले. गाडीतून उतरल्यावर बाबा एक मिनिट म्हणून त्याने पटकन आधी घराची सिक्युरिटी सिस्टिम ऑफ केली, आणि मग आम्ही आत गेलो. आत शिरल्या शिरल्या एव्हढ्या मोठ्या प्रवासाचा शीण एकदम गायब झाला. इतके सुंदर आणि आरामशीर घर, त्यात दिपालीने तिचे सगळे कसब लावून नटवलेले. पायातले शूज काढून सुजलेले पाय कुरवाळत त्याच्या गुबगुबीत सोफ्यावर जो टेकलो तो तासभर उठलोच नाही.

प्रवासात भरपूर खाणे झाले होते. पण मनासारखा चहा मिळाला नव्हता. डोळ्यावर झोप पण आली होती. मग दीपालीने मस्त गरम गरम चहा दिला तेंव्हा जरा फ्रेश झालो. मुलांच्या म्हणण्याप्रमाणे जरा लवकरच जेवलो आणि त्यांच्या वेळेप्रमाणे झोपलो तर जेटलॅग लवकर जाईल, म्हणून लगेच झोपलो नाही. आणि चहामुळे थोडी तरतरी पण आली होती. मग जरा आराम झाल्यावर संपूर्ण घर बघितले. सेंट्रलाईज्ड एसी. खालच्या मजल्यावर हॉल, डायनिंग आणि किचन. हॉलचे पडदे उघडले की काचेच्या खिडकीतून बाहेरचे हिरवेगार बॅकयार्ड दिसत होते. डायनिंग रूममध्ये मोठे सागवानी टेबल. मोठा किचन ओटा, मोठा फ्रिज, इलेक्ट्रिक डिश वॉशर, वरच्या मजल्यावर त्यांची बेडरूम, तिथेच एक पिक्चर रूम, जिथे भिंतीवर सगळ्यांचे फोटो लावलेले. स्टडी रूम मध्ये एक टेबल आणि त्यांचा लॅपटॉप. आणि शेवटी आईबाबा ही तुमची रूम म्हणून आमची बेडरूम दाखवली. मोठा बेड आणि त्यावर गुबगुबीत गादी, शेजारी कपाटांच्या ऐवजी क्लोजेट. त्यातच बॅगा ठेवून हँगरला कपडे अडकवायचे, त्यामुळे बेडरूम मोकळी. अटॅचड टॉयलेट वुईथ टब. बेडरूमच्या खिडकीचा पडदा उघडला की समोरची सुंदर घरे आणि त्यासमोरचे हिरवेगार लॉन. अजून काय हवं. पोरगं आईबापाला स्वतःच्या टुमदार बंगल्यात राहायचं सुख देणार होतं.

प्रसन्न दिपालीचे घर, समोरून

घरामागील हिरवळीवर 

डायनिंग रूम

हॉलमधल्या गुबगुबीत सोफ्यावर जस्ट रिलॅक्स

पिक्चर रूम

ह्या रूम मध्ये माझी नो लुडबूड

२ - नायगाराला भेट

आमची अमेरिकेची तिकिटे बुक केल्यानंतर प्रसन्न दीपाली पुढच्या कामाला लागले. आई बाबा येणार, मग त्यांना कुठे कुठे फिरवून आणायचे पासून ते त्यांना काय काय खायला/जेवायला द्यायचे ह्याचे प्लॅनिंग सुरु झाले. नविनच घर असल्यामुळे आईबाबांसाठी बेड आणि मॅट्रेस घेण्यापासून ते आमच्या दिवसभराच्या टाईमपाससाठी मराठी/हिंदी चॅनेल घेण्यापर्यंत कामे सुरु केली. अल्फारेट्टामधली, अॅटलांटामधली आणि जवळपासची प्रेक्षणीय स्थळे कोणची, आणि जिभेचे चोचले पुरवणारी हॉटेल्स कुठली ह्याची लिस्ट त्यांनी केली. दिपालीने तर सकाळ संध्याकाळचे ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंतचे रोजचे वेळापत्रक पण तयार केले. आम्ही येणार म्हणून सत्यनारायण पूजेची पण तयारी केली.

डिसेंबरमध्येच पुष्करच्या लग्नासाठी मोठी रजा घेतल्यामुळे लागोपाठ सुट्टी मिळणे जरा अवघडच होते. तरीही नायगारा फॉल्स आई बाबांबरोबरच बघायचा म्हणून त्यांनी शनिवार रविवारला जोडून एक मोठी सुट्टी घेतलीच. दोघांनी बसून न्यूयॉर्क-नायगारा ट्रिपचे प्लॅनिंग सुरु केले. पहिल्यांदा न्यूयॉर्कपासून रेंटल कारने ड्राइव्ह करत जायचे ठरवले. अमेरिकेत पोचल्यानंतर २-३ दिवस जेटलॅग राहील असे गृहीत धरून त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात जायचे ठरले. टाईम-टेबल पाहिल्यानंतर लक्षात आले की ड्राईव्ह करत गेलो तर थोडे हेक्टिक होईल, आणि सोमवारी कामावर जाणे अवघड होईल. म्हणून मग न्यूयॉर्कपासून नायगाराला विमानानेच जायचे नक्की केले. प्रोग्रॅम फायनल झाल्यावर प्रसन्नने लगेच सगळी बुकिंग्ज पण करून टाकली. आणि मग फोनाफोनी आणि स्काईप वरून आम्हाला सूचना यायला सुरुवात झाली. न्यूयॉर्क-नायगाराचे आपण जाऊ त्यावेळचे हवामान कसे असेल त्याप्रमाणे जॅकेट आणि स्वेटर घेऊन या, किंवा बॅगेचे वजन जास्त होत असेल तर ते आपण अमेरिकेतच विकत घेऊ या वगैरे वगैरे.

प्रसन्न-दिपालीच्या प्लॅनप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी आम्ही मिल्टनला पोचलो. आणि लगेच पुढच्या मंगळवारी रात्री न्यूयॉर्क-नायगारा ट्रीपसाठी निघालो. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता अटलांटावरून फ्लाईट होती. त्यामुळे मंगळवारीच बॅगा भरून तयार ठेवल्या. लवकर झोपायचे, लवकर झोपायचे म्हणत झोपायला १० वाजलेच. पहाटे एक वाजता उठून सगळे आवरून २ वाजता न्यूयॉर्क-नायगारा ट्रीपसाठी प्रस्थान केले. अॅटलांटा एअरपोर्टवर गाडी पार्किंग करायची होती. तिथे गेल्यावर जिथे जागा मिळाली तेथे गाडी पार्क केली आणि एअरपोर्टला जायला गाडीतून उतरलो. बाहेर येऊन बघतो तो काय, अॅक्च्युअल एअरपोर्ट किती तरी लांब होता. आता बॅगा घेऊन एवढ्या लांब चालत कसे जायचे ह्याचा विचार करत होतो तेवढ्यात समोर एक व्हॅन येऊन उभी राहिली. एक धट्टीकट्टी ड्राइव्हर आम्हाला बोलावत होती. एकदम जिवात जीव आला, सगळ्या बॅगा व्हॅनमध्ये टाकल्या आणि आत बसलो. तिने लगेच पार्किंग नंबर आणि आमचा गाडी नंबर नोट करून आम्हाला रिसीट दिली. आणि डायरेक्ट ज्या गेटवरून आमची फ्लाईट होती त्या गेटवर नेऊन सोडले. भारतातून आलो त्या अॅटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्टपेक्षा हा डोमेस्टिक एअरपोर्ट कितीतरी मोठा होता. अतिशय स्वच्छ आणि सुंदर परिसर, आर्टिस्टिक शो केसेस, विविध दुकाने, सर्व काही येथे होते. पहाटे तीनची वेळ असल्यामुळे सर्व दुकाने बंद होती. अगदी कॅफेसुद्धा एकच चालू होता. अजिबात गर्दी नव्हती. सॅंडविच आणि कॉफी घेत फ्लाईटची वाट बघत बसलो.

अॅटलांटा एरपोर्टवरील सुंदर शोकेस 

विमानाच्या प्रतीक्षेत

नेवार्कसाठी रवाना

ठरल्या वेळेनुसार ५.३० वाजता विमान उडाले ते बरोबर ८ वाजता नेवार्कला पोचले. पुढची बफेलोची फ्लाईट पावणे अकरा वाजता होती. मग अडीच तास तिथेच जागा शोधून बसून राहीलो. ह्या एअरपोर्टवरचे टॉयलेट मात्र अमेरिकेला न शोभेल एवढे खराब होते. जाऊ दे. बफेलो फ्लाईटची अनाउन्समेंट झाली आणि आम्ही बोर्ड झालो. केवढे छोटेसे विमान होते ते. एका बाजूला एक सीट आणि दुसऱ्या बाजूला दोन सिट्स, अशा एकूण वीसेक रांगा असतील बस्स. प्रसन्नने लवकर बुकिंग करून पहिल्या रांगांची तिकिटे काढली होती. विमानाच्या कॉकपीटमागेच सुजाताची सीट होती, आणि त्यामागे माझी. कॉकपीटमधलं सगळं अगदी जवळून दिसत होतं. एवढ्याशा त्या कॉकपीटमध्ये तो ढोल्या वैमानिक कसाबसा सिटमध्ये घुसून बसला. रुटीनप्रमाणे इंजिन चेक करून मेकॅनिक  खाली उतरले, आणि विमान चालू करणार इतक्यात वैमानिकाला काहीतरी डाउट आला आणि त्याने परत मेकॅनिकला बोलावले. अर्धा तास तो खटपट करत होता, इकडे आमच्या पोटात धस्स, कारण सगळे जवळून बघत होतो. आणि विमान पण इतके जुनाट होते. शेवटी इंजिनाशी झटापट संपून विमानाने एकदाचे उड्डाण केले. ढगाळ हवामानामुळे धक्के खात खात विमान चालले होते. विमानातून बाहेरचे दर्शन अतिशय सुंदर दिसत होते. ढगांतून जाताना तर एकदम अप्रतिम. मधून मधून ढगांच्या खाली गांवे दिसत होती. घरघर घरघर करत, धक्के खात खात शेवटी बफेलो एअरपोर्टला जिवंत पोचलो बाबा.


विमानातून

ढग पण किती शिस्तबद्ध लाईनमध्ये

प्रसन्नने सेल्फ ड्राईव्ह कार बुक केलीच होती, ती घेतली आणि ड्रीम डेस्टिनेशन नायगाराला जायला निघालो. परत एकदा सुंदर रस्ता, एका बाजूने निळी निळी नदी, आजूबाजूला नायगाराला जायच्या दिशादर्शक पाट्या बघत बघत नायगाराला आलो. मस्त हवा होती, विमानात असताना वाटत होते की पाऊस असेल, पण उतरल्यावर एकदम स्वच्छ वातावरण होते. प्रसन्नने गुगल अॅप लावले होते, ते बघत बघत, चुकून कॅनडाला तर नाही ना पोचणार म्हणून नीट काळजी घेत शेवटी नायगाराला पोचलो.

दिशादर्शक पाटी

सुंदर रस्ता, त्या बाजूला निळीशार नदी

पार्किंगसमोरच बरीच भारतीय हॉटेल्स दिसत होती, भूक पण लागली होती. मग जेवण करून धबधबा पाहायला जायचे ठरले. सुंदर नॉन-व्हेज बफे जेवण होतं, त्यामानाने स्वस्त पण होतं. मस्त पोट भरून घेतलं आणि जगातील काही आश्चर्यांपैकी एक आश्चर्य बघायला  निघालो. लांबूनच उंच असे फवारे दिसत होते. पार्किंगपासून फॉलपर्यंत जायचा रस्ता म्हणजे एक गार्डनच आहे. सुरुवातीलाच काही तुलीप्स होते. पांढरे बगळे सर्वत्र संचार करून होते. तांबूस पानांची झाडे होती. इथे खूप भारतीय प्रवासी होते. मराठी पण बरेच भेटले. चिनी लोकांचे पण काही ग्रुप्स होते. 


धबधब्याचे दुरून दर्शन

सुंदर झाडे

तुलीप्स

ग अगदी जवळून फॉल पहाण्यासाठी फेरी बोटचे तिकीट काढले. भिजू नये म्हणून त्यांनी निळे रेनकोट दिले ते अंगावर चढवले आणि त्या फेरी बोटवर चढलो. अहाहा, काय अप्रतिम दर्शन होते ते. बोट जसजशी जवळ जात होती, तसतशे अंगावर फवारे येण्याचे प्रमाण वाढू लागले. वारा पण सॉलिड होता. रेनकोटची टोपी सारखी उडत होती, शेवटी त्या रेनकोट-टोपीकडे दुर्लक्ष करून भिजलो तर भिजलो म्हणून ते स्वर्गीय सौंदर्य अनिमिष नजरांनी बघत बसलो. दणादण फोटो काढले, जवळून व्हिडीओ पण घेतला. बस्स, डोळ्याचे पारणे फिटले. कवी लोकांच्या भाषेत  बोलायचे तर, डोळ्यांचा एवढा सुंदर उपयोग कितीतरी वर्षांनी करत होतो. ह्याआधी काश्मीरला केला होता. एक नक्की, इथे येण्याने अमेरिकेतील वास्तव्याचे चीज झाले. हे सगळे प्रसन्न दीपालीमुळे घडले. ते अमेरिकेत नसते तर आम्ही कशाला इकडे एवढ्या लांब आलो असतो.

फेरी बोटीतून धबधबा

सेल्फी


स्वर्गीय नेत्रसुख

रात्री ह्या फॉल्सवर रंगीत दिव्यांची पखरण होते, म्हणून ते बघूनच निघायचे ठरले. सूर्यास्त रात्री ९ नंतर असल्यामुळे बरेच प्रवासी लवकरच निघून गेले. थंडी पण कडाक्याची सुरु झाली होती. स्वेटर आणि जॅकेट आणली नसती तर पार गोठून गेलो असतो. मग इकडे तिकडे फिरत, फोटो काढत, कॉफी घेत घेत वेळ काढत बसलो. सुजाता चांगलीच दमली होती. दमली म्हणण्यापेक्षा तिची कंबर दुखायला लागली होती. मी पण तसा दमलो होतो, पण दाखवत नव्हतो. म्हणून आम्ही दोघे एक मस्त बेंच पकडून आरामात बसून राहिलो. प्रसन्न दिपाली मात्र पार नदीच्या पलिकडे जाऊन तिकडचा परिसर बघून आले. आजूबाजूला खारींचे साम्राज्य होते. पांढरे बगळ्यासारखे पक्षी न घाबरता लोकांच्या खायच्या प्रकारांवर लक्ष ठेवून बसले होते. समोर कॅनडातील इमारती, हॉटेल्स, उंच स्कायव्हील दिसत होती. एक अमेरिकन मुलगी तान्ह्या बाळाला हिरवळीवर शाल टाकून, त्याला त्यावर झोपवून बाटलीने दूध पाजत होती. नंतर त्याला पट्ट्याने पोटाशी बांधून ती निघून गेली. 

प्रसन्न इन अॅक्शन

नदीजवळ

नदीच्या पलीकडला भाग

लायटींगची वाट बघत जस्ट रिलॅक्सींग

कॅनडातल्या इमारती

कॅनडातील स्काय व्हील

संध्याकाळ झाल्यावर कॅन्टीन बंद व्हायच्या आत आम्ही जेवून घेतले. आणि अंदाजे ९.३० ला रंगीत लाईट्स सुरु झाले. लायटिंग सुरु झाल्यावर आम्ही बेंच सोडून पुढे रेलिंगपर्यंत आलो. सर्वत्र अंधार होता, आणि धबधब्यांच्या त्या फवाऱ्यांवर  समोरून कॅनडाच्या बाजूने लाल हिरवे लाईट सोडले होते. फार सुंदर विलोभनीय दृश्य होते ते. प्रसन्नने काही मस्त फोटो काढले. पण दिवसभर इकडेतिकडे चालल्यामुळे खूप दमलो होतो, आणि कडाक्याच्या थंडीमुळे थोडे वैतागलो पण होतो. तेंव्हा लाइटिंग संपेपर्यंत न थांबता थोड्याच वेळात आम्ही निघालो. सकाळी ६ वाजताची फ्लाईट होती, त्यामुळे पहाटे तीन वाजता उठायचे पण होते. एअरपोर्टपासून जवळचेच हॉटेल असल्यामुळे त्यामानाने सकाळी फार घाईघाई न करता उठून, आंघोळ वगैरे करून, रेंटेड कार एअरपोर्टवर सरेंडर करून शांतपणे नेवार्कसाठी निघालो.


अल्टिमेट

३ - एलिस आयलँड आणि स्टॅच्यू आॅफ लिबर्टी

मंत्रमुग्ध नायगारा धबधब्याला रामराम करून आम्ही बफेलो एअरपोर्टजवळच्याच डेज हॉटेलला पोचलो. एकच मोठी रूम होती, त्यात दोन मोठी डबल बेड्स, आणि स्टार हॉटेलच्या सगळ्या सुविधा. खूप रात्र झाली असल्यामुळे फटाफट कपडे बदलले आणि कॉटवर आडवे झालो. पण प्रसन्नची एक खासियत आहे. झोपायच्या आधी उद्याचा आपला कार्यक्रम काय आहे, किती वाजता उठावे लागेल आणि किती वाजता हॉटेल सोडावे लागेल ह्या सगळ्या सूचना देऊन मगच तो आम्हाला झोपायला परवानगी द्यायचा. त्याप्रमाणे हा कार्यक्रम पार पडला आणि पाठ टेकताच निद्रादेवी प्रसन्न झाल्या. सुजाता आणि प्रसन्नने गजर लावले होतेच. सकाळी ६ वाजताची फ्लाईट होती. त्यामुळे विमानतळावर ५ वाजता पोचायचे होते. नेहमीप्रमाणे सुजाता पहिली उठून आवरायला गेली तिच्या खडबडीने मी जागा झालो. आमचे दोघांचे आवरून झाल्यावर मुलांना उठवले. त्यांनी पण पटापट आवरून घेतले आणि बॅगा घेऊन चेकआऊटसाठी काऊंटरला आलो. पहाटे ४ वाजता पण हॉटेलचे रेस्टॊरंट चालू होते. आमच्यासारखे अजूनही काही प्रवासी होते ज्यांना फ्लाईट पकडायची होती. कॉफी तयार होती, आणि स्नॅक्सची तयारी चालू होती. आमचे विमान लगेचच होते, त्यामुळे गरम गरम कॉफी घेऊन आम्ही हॉटेल सोडले. विमानतळावर कार सरेंडर करून कस्टम चेकइन करून बोर्डिंग गेटजवळ येऊन बसलो.

छोट्या विमानाचा येतानाचा चांगलाच अनुभव असल्यामुळे नेवार्कला जाताना विमानाच्या घरघरीचा काही त्रास झाला नाही. इन फॅक्ट सकाळी सकाळी विमानातून सूर्योदय इतका सुंदर दिसत होता, त्यामुळे ती घरघर जाणवली पण नाही. ऍटलांटा एअरपोर्टपासून इतकी कॉफी झाली होती की सकाळ असून देखील विमानात मी कॉफीच्या ऐवजी कोक घेणेच पसंत केले. प्रसन्न आणि दीपाली तर विमानात बसल्या बसल्या जे झोपले ते नेवार्कला लॅन्ड करायच्या वेळेसच उठले. नेवार्कला उतरल्यावर आधीच्या प्रोग्रॅमप्रमाणे डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जायचे, ती टूर न्यूयॉर्कला संपवायची, आणि तिथून हॉटेलला जायचे ठरले होते. पण आमच्या बॅगा घेऊन स्टॅच्यूला जायला परवानगी मिळणार नव्हती. मग प्रोग्रॅम थोडा बदलला. एअरपोर्टला बसमध्ये बसून पेन मेट्रो स्टेशनला पोचलो. न्यूजर्सीतला हा बसचा प्रवास पण वेगळाच अनुभव होता. अल्फारेट्टामध्ये अमेरिकेच्या वाहतूक शिस्तीचे जे गुणगान करत होतो, त्याचा इथे लवलेशही नव्हता. आपल्या पुण्यातला जागा मिळेल तिथून गाडी चालवायची हा अलिखित नियम बहुधा इथूनच आला असावा.

विमानातून सूर्योदय

एनीवे. पेन स्टेशन बऱ्यापैकी वर्दळीचे होते. आमची तर रेल्वेची सवय पूर्ण गेली होती. पण इथल्या मेट्रोजची फ्रिक्वेन्सी खूप भारी होती. त्यामुळे गर्दी जाणवली नाही. कमाल म्हणजे काहीजण सायकलने स्टेशनला यायचे, सायकल ट्रेनमध्ये घेऊन जायचे, आणि त्यांच्या डेस्टिनेशन स्टेशनवर उतरून त्याच सायकलवरून आपल्या कामाला निघून जायचे. किती छान सोय. इथे दोन कंपन्यांच्या मेट्रो रेल्वे होत्या. पाथ आणि एनजे. आमची पाथ कंपनीची मेट्रो होती. पेन स्टेशन जुने होते पण स्वच्छ होते. स्टेशनवर गर्दी होती पण ट्रेनमध्ये आरामात चढायला मिळाले, आणि बसायला जागा पण मिळाली. पुढे सुजाता आणि दीपाली एक्सचेंज प्लेस स्टेशनवर उतरल्या, मी आणि प्रसन्न त्याच ट्रेनने पुढे गेलो. शेवटच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर स्टेशनवर उतरलो आणि हॉटेलमध्ये बॅगा क्लोकरूममध्ये ठेवल्या. स्टेशन ते हॉटेल ह्या पाचच मिनिटाच्या रस्त्यावर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. किती उंच बिल्डिंग होती. पण उद्या तिथे जायचे असल्यामुळे वेळ न घालवता पाथ स्टेशनला आलो. हे पाथ स्टेशन म्हणजे एक आदर्श नमुना. ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर पूर्वीचे हे हडसन टर्मिनल नव्याने बांधून तयार केले. अतिशय सुंदर, शॉपिंग मॉल मधून प्रवेश, रेल्वे स्टेशनला जायला एस्कॅलेटर्स, ईलेव्हेटर्स. मार्बल टाईल्स, अपटुडेट सिक्युरिटी. तिथे अजुनही कामे चालू होती. आत मध्यभागी खूप मोठी मोकळी जागा ठेवली आहे आणि तिथे अमेरिकेचा मोठा झेंडा लावलाय. त्या झेंड्याखाली एक फोटो तो बनता ही था. ह्या सुंदर स्टेशनवर परतीची ट्रेन पकडली आणि परत एक्सचेंज प्लेस स्टेशनवर आलो. स्टेशनबाहेर एक फूड ट्रक उभा होता. बरेच लोक काहीतरी घेऊन खात पित होते. हॉटेलपेक्षा हे स्वस्त पडते म्हणून चाकरमान्यांची फूड ट्रक्सना पसंती असते. विशेष काही नाही, आपल्याकडे वडापाव चहाच्या गाड्या असतात तसे हे सँडविच कॉफीचे फूड ट्रक. जाताजाता प्रसन्न अशा बारीकसारीक गोष्टी पण दाखवत होता. सुजाता आणि दीपाली तिथेच स्टेशनजवळ स्टारबक्सच्या बाहेर कॉफी सँडविच आणि  उन खात बसल्या होत्या. मग आम्ही दोघे पण त्यांना जॉइन झालो.

पाथ स्टेशनवर मेट्रो

पाथ स्टेशनवर अमेरिकेचा झेंडा 

स्टारबक्सपासून स्टॅच्यू आॅफ लिबर्टीला सुटणाऱ्या फेरीबोटचे ठिकाण जवळच दिसत होते. पण आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या लोकल माणसाने सांगितले की फेरीबोट स्टेशन जवळ दिसत असले तरी मध्ये पाणी असल्यामुळे अंतर खूप लांब आहे. मग टॅक्सीने जाणेच योग्य ठरेल म्हणून प्रसन्नने लगेच उबेर बोलावली. दोन मिनिटात टॅक्सी हजर. टॅक्सी ड्रायव्हर एक लेडी होती. इथल्या टॅक्सी ड्रायव्हर्सची एक खास बात म्हणजे आपल्याला आवडो न आवडो, कंटीन्युअस गप्पा मारत असतात. ही बाईपण तशीच. कुठे जायचे चौकशी करून तिने बरोबर जिथे तिकीट काढतात तिथे सोडले. प्रसन्नने आधीच अॉन लाईन तिकीट काढले असल्यामुळे आम्ही चालत चालत फेरी स्टेशनला पोचलो. विमानतळावर असते तशी कडक सिक्युरिटी इथे पण होती. सिक्युरिटी चेकिंग करुन फेरीबोटीत चढलो. फेरीबोट सुटायची वेळ झाली आणि त्यांनी दोर सोडून बोट पाण्यात सोडली. एका ग्रुपमधले काहीजण पळत पळत येत होते आणि फेरीत चढलेले त्यांचे साथीदार दोन मिनिटे थांबायची रिक्वेस्ट करत होते. पण एकदा सुटलेली बोट बिलकुल थांबली नाही. ती उरलेली माणसे नंतरच्या फेरीतुन आली.


स्टारबकबाहेरून वन वर्ल्ड सेंटर

स्टॅच्यू क्रूझ 

फेरीचा पहिला स्टॉप होता एलिस आयलँड. इथे अमेरिकेत मायग्रेट झालेल्या वसाहतींच्या अगदी प्राचीन इतिहासाचे एक खूप मोठे प्रदर्शन आहे. नेटिव्ह अमेरिकन हे प्रदर्शन फारच गौरवाने बघत होते. हे दोन मजली प्रदर्शन बघण्यापेक्षा सुजाताने तिथल्या बागेत एका बाकावर बसणेच पसंत केले. प्रदर्शन खूप छान आहे, माहितीपूर्ण आहे. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर ते फारच उपयुक्त आहे. खूप जुने जुने फोटो, लिखाणे लावली आहेत. खालच्या मजल्यावरचे सगळे बघून झाल्यावर सुजाता बाहेर एकटीच बसली होती म्हणून मी बाहेर आलो. प्रसन्न दीपाली वरच्या मजल्यावर पण फिरून आले. एलिस आयलँडवर फार टाईम पास न करता आम्ही लगेचच पुढच्या फेरीबोटने लिबर्टी आयलँडला आलो. 


एलिस आयलँड

प्रदर्शनातील माहितीपूर्ण पृथ्वीगोल 

अमेरिकेत आल्यावर न चुकवायची दोन महत्वाची ठिकाणे म्हणजे नायगारा फॉल्स आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. नायगारा फॉल्स कालच बघून झाला होता. आता ह्या दुसऱ्या महत्वाच्या ठिकाणी आम्ही आलो होतो. एलिस आयलँडवरून फेरी सुटल्यावर स्टॅच्यूचे दर्शन व्हायला सुरुवात झाली होती. मुख्य म्हणजे हवा पण इतकी सुंदर पडली होती. थोडीशी ढगाळ, थोडेसे ऊन. त्यामुळे उन्हाचा चटका नव्हता. लिबर्टी आयलँडवर उतरल्यावर प्रसन्न दीपालीला भूक लागली होती. आमची पण तशी जेवायची वेळ झाली होती. मग तिथेच कॅन्टीनमध्ये जागा पकडून मी आणि सुजाता बसलो. गुरुवार असल्यामुळे सुजाता व्हेजिटेरियन खाणार होती, आणि आम्ही तिघे नॉन व्हेजिटेरियन. प्रसन्न दीपाली जेवण आणायला गेले. बिचारे सगळे काउंटर फिरले पण सगळीकडे तळलेलेच पदार्थ होते. सुजाताला व्हेज बर्गर, ओनियन रिंग्ज आणि पोटॅटो चिप्स, आणि आमच्यासाठी ओनियन रिंग्ज, पोटॅटो चिप्स प्लस फिश फिंगर्स आणले होते. इथली पाण्याची बाटली पण वैशिष्ट्यपूर्ण होती. त्याच्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे चित्र छापले होते. नॉर्मली रिकामी बाटली आपण फेकून देतो, पण ही बाटली आम्ही मोमेंटो म्हणून पुण्याला घेऊन आलो.







जेवण झाल्यावर जरा फ्रेश झालो, आणि आम्ही पुतळ्याकडे निघालो. खालून पुतळा पाहिलाच होता, दीडशे फूट उंच असा हा अतिशय भव्य पुतळा तांब्याचा आहे. लिबेर्टास (LIBERTAS) ह्या रोमन देवीचा हा पुतळा फ्रान्सच्या जनतेकडून अमेरिकेला भेट म्हणून मिळाला आहे. फ्रान्समधून छोट्या छोट्या तुकड्यांत हा पुतळा आणला गेला आणि इथे ते तुकडे जुळवून पुतळा उभा केला. तांब्याचे बाहेरच्या हवेशी झालेल्या रासायनिक प्रकियेमुळे हा पुतळा आता मस्त निळा झालाय. आम्हाला आता ह्या पुतळ्याच्या अगदी जवळ जायचे होते. त्यासाठी पुतळ्याच्या आतल्या बाजूने जिने आणि लिफ्टची सोय आहे. प्रसन्न दीपाली पटापट जिने चढून वर गेले. मला आणि सुजाताला लिफ्टने वर जायची परवानगी मिळाली. वर अगदी पुतळ्याला चिकटून आम्ही तो पुतळा पाहीला आणि परत एकदा प्रसन्न दीपालीला मनातल्या मनात धन्यवाद दिले. पुतळ्यावरून न्यू जर्सी आणि मॅनहॅटन अतिशय सुंदर दिसत होते. ढगाळ हवेमुळे छान गारठा होता. थोडेसे पावसाचे शिंतोडे पण उडल्यासारखे झाले, पण पाऊस पडला नाही त्यामुळे आम्हाला मस्त एन्जॉय करता आले. भरपूर फोटो काढले आणि आम्ही खाली उतरलो. उतरताना उत्साही प्रसन्न दीपाली पळत पळत अजून वर जाऊन फोटो काढून आले. नंतर पुतळ्याच्या कडेने बाहेरून एक चक्कर मारली. पूर्ण पुतळा सगळ्या बाजूंनी पाहीला, खरंच धन्य झालो. पाठीमागे नेहमीप्रमाणे त्यांचे मोमेन्टो वगैरेचे दुकान होते. तिथे एक छान पुतळा पुण्यासाठी म्हणून घेतला, आणि परत फेरीबोटीकडे आलो. 

सेल्फीचा मोह

स्वातंत्र्यदेवीचा पुतळा

पुतळ्यावर बाहेरच्या बाजूला

पुतळ्यावरून न्यूजर्सी आणि मॅनहॅटन 

आता हॉटेलवर जायचे असल्यामुळे मॅनहॅटन, न्यूयॉर्कला जाणाऱ्या फेरीत बसलो आणि आमच्या मुक्कामाच्या जवळच बॅटरी पार्कला उतरलो. ही बाग पण खूप छान आहे. तिथेच काही अमेरिकन मुलांचा डान्स शो चालू होता. आपल्याकडे जसा रस्त्यांवर डोंबाऱ्याचा खेळ असतो, तसाच काहीसा हा प्रकार. बॅटरी पार्कपासून आमचे हॉटेल पाचच मिनिटांवर होते. एक मेन रोड आणि एक लेन क्रॉस करून जायचे होते. सकाळपासून चालून चालून आम्ही सगळेच दमलो होतो. सुजाताला तर एवढेसे अंतर चालणेसुद्धा जड जात होते. हॉटेलमध्ये पोचल्यावर क्लोकरूम मधून बॅगा ताब्यात घेतल्या, चेक इन केले आणि रूमवर जाऊन जी ताणून दिली. प्रसन्न दीपाली मात्र बाहेर जाऊन जेवण घेऊन आले. सुजाता इतकी दमली होती कि ती जेवायला पण उठली नाही. मी फक्त कॉर्न सूप प्यालो. हे सूप पण फारच छान होते. भरपूर कॉर्न्स आणि थोडी हळद टाकली असावी. मस्त घसा शेकत शेकत सूप घेतले आणि लगेच  झोपून गेलो. पहाटे बफेलोला होतो, रात्री न्यूयॉर्कला. दिवसभर भरपूर  फिरलो, दमलो, पण दिवस इतका मस्त गेला काय सांगू.