Sunday, February 12, 2017

५ - न्यूयॉर्क क्रूझ टूर, ग्रँड सेंट्रल टर्मिनल,अॅपल स्टोअर

आज सकाळी सकाळी कुठेही जायचा प्लॅन नव्हता. त्यामुळे शांतपणे उठलो. खिडकीतून वन डब्ल्यू. टी. सी. चे दर्शन घेतले. हवा जरा ढगाळच दिसत होती. त्यामुळे मोबाईलवर दिवसभराचे हवामान कसे असेल ते पाहिले. आज दिवसभर हवा ढगाळ राहणार असून संध्याकाळनंतर पाऊस पडू शकेल असा अंदाज होता. म्हणजे आमची क्रूज टूर तर व्यवस्थित होणार होती. आणि प्रसन्नच्या म्हणण्याप्रमाणे पाऊस आला तरी क्रूजचा काही भाग कव्हर्ड असतो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नव्हता. १२ वाजता टूर सुरु होणार होती. ब्रेकफास्ट घेतल्यानंतर लगेच जेवण पण गेले नसते म्हणून मग क्रुजमध्ये कॅन्टीन आहे तिथेच काही खायचे ठरले. नेहमीप्रमाणे उबेरची टॅक्सी बोलावली. अनपेक्षितपणे हा ड्रायव्हर शांत होता. वयाने पण मोठा होता. जेवढ्यास तेवढेच उत्तर द्यायचा. असो. वेळेच्या जवळजवळ तासभर आधी आम्ही पोचलो. थोडी रिमझिम चालू झाली होती, हवेत गारठा पण होता. थोडे उनपण होते. एकंदरीत मस्त वातावरण होते. मग थोडे फोटो काढण्यात वगैरे वेळ काढला.

मस्त हवेत क्रूजची वाट पहाताना

सर्कल लाईन क्रूज

थोड्याच वेळात बोटीवर चढायला सुरुवात झाली. रांगेत आम्ही अगदी पहिल्या काहीजणांत असल्यामुळे हव्या त्या जागा मिळू शकल्या. रिमझिम थांबली होती, पण ऊन होते. प्रसन्न दीपाली ओपन डेकवरच बसले, मी  सुजाता एकदम साईडची खिडकीजवळची जागा पकडून आतमध्ये बसलो. हळूहळू बऱ्यापैकी गर्दी झाली, आणि शार्प १२ वाजता बोट जागेवरून हालली. हडसन नदीच्या किनार्‍यापासून सुरूवात झाली. स्टॅच्यू अॉफ लिबर्टी, कॅम्पाकोला, कोलगेट, यांकी स्टेडियम, रेल्वे यार्ड, नेवी सेंटर पासून ते युनो बिल्डिंग, एम्पायर स्टेट बिल्डिंग, वन डब्ल्यू. टी. सी. टॉवर वगैरे खूप काही ठिकाणे दाखवली. बरोबर दिड तासाने ही टूर संपली. न्यूयॉर्क ट्रिपमधली ही अजून एक संस्मरणीय टूर. नदीच्या दोन्ही बाजूच्या उंच उंच बिल्डिंग्ज, हिरवेगार कॅम्पस, प्रेक्षणीय स्थळे बघता बघता भूकेचे भान पण राहिले नाही. बोटीवर फक्त कॉफी घेतली आणि उतरायची वेळ झाली.



क्रुजमधून युनो बिल्डिंग

क्रुजमधून

क्रुजमधून

क्रुजमधून

बोटीतून उतरल्याबरोबर टॅक्सी घेऊन ग्रँड सेंट्रल रेल्वे स्टेशनला आलो. प्रसन्नकडून ह्याच्या इंटेरियरबद्दल ऐकले होते. आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला होता. बाहेरून अगदी साधे वाटणारे हे रेल्वे स्टेशन आत प्रवेश केल्याबरोबर त्याच्या झगमगाटाने डोळे दिपवून टाकते. सर्वत्र सुंदर नक्षीकाम, मोठी मोठी झुंबरे ह्यांनी सगळा परिसर सोनेरी दिसत होता. सर्व प्रकारची दुकाने झगमगत होती. रेल्वे स्टेशनपेक्षा एखाद्या मॉलमध्ये गेल्यासारखे वाटत होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर एक कॉफी सोडून पोटात काही गेले नव्हते. प्रसन्नला तर कधीपासून भूक लागली होती. मग आम्ही खालच्या मजल्यावर गेलो. इथे खूप फुड स्टॉल्स होते. अतिशय सुंदर अशा ह्या स्टॉल्समध्ये विविध प्रकारच्या, विविध देशांच्या चविष्ट डिशेस मिळतात. सर्वत्र अप्रतिम स्वच्छता आहे. इथे कोपर्‍या कोपर्‍यात कचरा पेट्या ठेवल्या आहेत. आपले खाऊन पिऊन झाल्यावर सर्वजण इमानदारीने टेबल साफ करून, खरकट्या पेपर डिशेस, बॉक्सेस आणि पेपर ग्लासेस त्यात टाकतात होते. बर्‍याचदा उरलेले अन्न पण त्यात असायचे. सगळीकडे अमेरिकन गोर्‍यापान बायका आणि पुरुष ह्यांची लगबग होती. आमच्यासारखे प्रवासी निवांतपणे खातपीत बसलेले होते. आम्ही पण एका कोपऱ्यात एका टेबलावर प्रसन्न दीपालीने आणलेले इंडियन फूड एन्जॉय करत बसलो.

ग्रँड सेंट्रल टर्मिनल

स्टेशनमधली दुकाने

जेवायला बसण्यासाठी स्वतंत्र जागा

गोल्डन लूक इंटेरिअर

सुंदर झुंबरं
थोड्या वेळाने अचानक एक सुटाबूटातला, गोरापान, श्रीमंत दिसणारा अमेरिकन इसम एका कचरापेटीत काहीतरी चाचपडताना दिसला. साधारण वयस्कर, दाढी वाढलेला हा इसम टेक्सास फिल्ममधल्या लोकांसारखा दिसत होता. मला वाटले की चुकून त्याची काहीतरी महत्वाची वस्तू टाकली गेली असेल, आणि तो ती शोधत असेल. थोड्याच वेळात त्याने एक बॉक्स बाहेर काढला. वाटलं बहुतेक मिळाली बाबा त्याची हरवलेली वस्तू. पण बघतो तो काय, त्याने तो बॉक्स उघडला आणि त्यातले उरलेले उष्टे अन्न खायला सुरुवात केली. ह्या श्रीमंत देशात दिसते तसे नसते ह्याची इतकी केविलवाणी प्रचीती येईल असे मला तरी वाटते नव्हते.

स्टेशनवरून बाहेर पडलो. न्यूयॉर्कला आलो आणि बाबांना अॅपल स्टोअर दाखवले नाही हे प्रसन्नला पटणे शक्यच नव्हते. मग काय, आमची सफर तिकडे वळली. एका काचेच्या मोठ्या बॉक्सवर अॅपलचे चिन्ह अॅपलप्रेमी लोकांना आकर्षित करत होते. काचेच्याच लिफ्टमधून खाली स्टोअरमध्ये उतरलो. अॅपलची आयफोन, आयपॉड, आयवॉच, कॉर्डलेस डेस्कटॉप वगैरे सगळ्याची लेटेस्ट मॉडेल्स तिथे होती. बाबा हे वॉच बघा, आई हा लॅपटॉप बघ किती छोटा आणि स्लिम आहे, दीपाली ही म्युझिक सिस्टीम बघ, काय काय दाखवू आणि काय नको असे प्रसन्नला झाले होते. शेवटी त्याला वेळेची मर्यादा लक्षात आणून दिली आणि आम्ही बाहेर पडलो.


अॅपल स्टोअरसमोर

म्युझिक सिस्टीम टेस्ट करताना

कॉर्डलेस कॉम्पुटर
समोरच ग्रँड आर्मी प्लाझाची बिल्डिंग होती. तिच्या प्रवेशद्वाराजवळ चारपाच देशांचे झेंडे होते, त्यात आपला भारताचा झेंडा पण होता. परदेशात आपला तिरंगा पाहून एक वेगळीच भावना जागृत होते ह्याचे प्रत्यंतर तिथे आले. एक फोटो तर इथे हवाच होता. तिथेच एक रस्ता ओलांडून प्रचंड मोठे असे सेंट्रल पार्क होते. त्याचे धावते दर्शन घेतले, आणि हॉप-अप बसमध्ये बसून टाईम्स स्क्वेअरला आलो. हॉप-अप बसची पहिली नाईटलाईफ टूर ७ वाजता होती. दिवसाची टूर आम्ही केली होती, पण रात्री लायटिंगमध्ये न्यूयॉर्क खूप छान दिसते म्हणतात. म्हणून एवढ्या लवकर हॉटेलवर परतण्यापेक्षा ही टूर करायचे ठरले. बसमध्ये बसलो. बस सुटल्यावर थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला, आणि नाईलाजाने डेकवरून खाली येऊन खिडकीतून बाहेरचे बघत बसलो. पण बसच्या काचा गॉगलच्या असल्याने म्हणावी एवढी मजा आली नाही. एवढ्या मोठ्या ट्रिपमध्ये पावसामुळे केलेली ही पहिलीच पंचाईत. त्यामुळे एवढे वाईट वाटायचे काहीच कारण नव्हते. टूर संपवून बसने आम्हाला परत टाईम्स स्क्वेअरला सोडले. लागोपाठ दुसर्‍या रात्री आम्ही टाईम्स स्क्वेअरला होतो, आणि इथला झगमगाट अनुभवत होतो.

ग्रँड आर्मी प्लाझाबाहेर

रात्रीचे न्यूयॉर्क

No comments:

Post a Comment