पुण्याहून अॅटलांटाला संध्याकाळी ४.३० च्या सुमारास पोचलो होतो. बर्याच दिवसांनी प्रसन्न दीपाली भेटले होते, त्यामुळे गप्पा मारत मारत घरी पोचलो. डोळ्यावर थोडी झापड होती, पण मुलांच्या सल्ल्यानुसार रात्रीचे जेवण घेऊनच झोपायला गेलो. त्यामुळे जेटलॅग लवकर गेला. तरीही सुरूवातीला काही दिवस सकाळी खूप लवकर, म्हणजे चार साडेचारलाच जाग यायची. मग काय करणार, एकटाच उठून खाली यायचो, हातात गरम गरम ग्रीन टी चा मग घेऊन यूट्युबवर भीमसेन जोशी, सुधीर फडके ऐकत बसायचो. हॉलचे पडदे उघडले की सकाळचे कोवळे उन घरात यायचे. एक दिवस असाच बाहेर बसून चहा घ्यायचा विचार मनात आला. मागचे बॅकयार्डचे दार उघडले आणि जोरजोरात ट्यँ ट्यँ अलार्म वाजायला लागला. पळत पळत जाउन पहिल्यांदा सिक्युरिटी अलार्म बंद केला. नशीब प्रसन्नने आदल्याच दिवशी कोड सांगून ठेवला होता. अलार्म बंद करेपर्यंत प्रसन्न पण धाडधाड आवाज करत खाली आला होता. माझ्या एका क्षुल्लक निष्काळजीपणामुळे सगळ्यांची झोपमोड झाली होती. नशीब शेजारीपाजारी कोणी आले नाहीत. त्यावेळेपासून कानाला खडा, उठल्या उठल्या पहिल्यांदा सिक्युरिटी सिस्टीम आॅफ करायची आणि मग बाकी.
एनीवे, जेटलॅगच्या शक्यतेमुळे पहिला शनिवार रविवार आम्ही जवळपासच फिरायचे ठरवले होते. रविवारी सकाळीच आम्ही जवळच्या विल्स पार्कला गेलो. अमेरिका वास्तव्यातील पाहिलेली पहिली बाग हीच. मस्त हवा पडली होती, कोवळे छान उन होते, हिरवेगार लॉन्स, आणि त्यात फिरण्यासाठी रस्ते, बाजूला उंच पाईन्स, कसे मस्त वाटत होते. बरीच मंडळी मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगसाठी आली होती. पार्कमध्येच टेनिस आणि बेसबॉलची कोर्ट्स पण होती. तिथे लहान मुलांची ट्रेनिंग्ज चालू होती. पार्कच्या एका कोपर्यात कुत्र्यांना फिरवण्यासाठी वेगळी जागा ठेवली होती. एका बाजूला एका मोठ्या शेडखाली एक २०-२५ जणांचा ग्रुप घरून आणलेले डबे उघडून ब्रेकफास्ट एंजॉय करत होता. आम्ही त्या सुंदर वॉकिंग ट्रेलवरून एक मोठी चक्कर मारली. इथे परत एक सुंदर शिस्त दिसली. आम्ही चौघे गप्पा मारत चालत होतो, पण मागून कोणी जॉगर येताना दिसला की प्रसन्न आम्हाला रस्त्याच्या उजव्या बाजूला घेऊन त्याला वाट करुन द्यायचा. त्याने आम्हाला दाखवले की बघा सगळे कसे उजवीकडूनच चालत आहेत. ह्या छोट्या मोठ्या गोष्टीतसुद्धा सगळे कसे शिस्तबद्ध होते. इथला अजून एक वेगळा अनुभव म्हणजे समोरून येणारे ते गोरेपान अमेरिकन्स, ना ओळख ना पाळख, मस्त स्माईल द्यायचे, हाय, गुड मॉर्निंग म्हणत पुढे जायचे. अनोळखी देशात ह्या असल्या गोष्टींमुळे किती प्रसन्न वाटते म्हणून सांगू. ह्याच विल्स पार्कला परत ४ जुलैला यायचा योग होता.
 |
| विल्स पार्क वॉकिंग ट्रेल |
 |
| विल्स पार्क बेसबॉल ग्राउंड |
४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. ह्या दिवशी अमेरिकेत सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस सगळे अमेरिकन मोठ्या उत्साहात साजरा करतात. फॅमिली गेट-टुगेदर, पिकनिक, पार्ट्या अशा प्रकारे, जणू काही आपल्या घरातल्या कोणाचा वाढदिवस असल्यासारखे हे सेलिब्रेशन असते. मोठ्यामोठ्या गार्डन्समध्ये रात्री फटाक्यांची आतीषबाजी असते. ह्या वर्षी आम्ही ४ जुलैला अमेरिकेत असल्यामुळे हा उत्साह आम्हाला बघायला मिळाला. अल्फारेट्टामध्ये २-३ ठिकाणी हा फायरवर्कचा कार्यक्रम असतो. सगळा विचार करून आम्ही विल्स पार्कला जायचे ठरवले. रात्री ९ वाजता विल्स पार्कला फायरवर्क सुरू होणार होते. पण त्यावेळी एवढी गर्दी असते की आयत्या वेळेला कारला पार्किंगसाठी आणि आम्हाला बसण्यासाठी जागा मिळणे अशक्य होईल, म्हणून आम्ही दुपारी ४ वाजताच चहा घेऊन घराबाहेर पडलो. विल्स पार्कला जायच्या मेन रोडवर आलो, आणि पार्कच्या अलिकडच्या चौकातच पार्ककडे जाणारा रस्ता बंद केला होता. ह्याचा अर्थ आत्ताच खूप गर्दी झालेली असून पार्किंगचे वांदे होणार होते. मग प्रसन्नने त्या चौकात डावीकडे गाडी घेतली आणि पार्कच्या मागच्या गेटने गाडी आत घेतली. खूप गर्दी होती, पण पार्किंगला जागा चांगली मिळाली म्हणून बरे झाले. नाहीतर बाहेर कुठेतरी रस्त्यावर गाडी लावून तंगडतोड करत यावे लागले असते. पार्किंगमधून आत गेलो आणि लगेचच एका बाजूला फूडट्रक्सची रांग दिसली. पण कुठेही न थांबता रात्रीचे फायरवर्क नीट दिसावे म्हणून चांगली जागा पकडायला सरळ आत पार्कमध्येच शिरलो. प्रसन्नची एक सहकारी रुपाली आणि तिची फॅमिली आधीच आत गेले होते. त्यांच्या इथेच आमच्यापुरती मोकळी जागा होती. कोल्हापूरच्या ह्या फॅमिलीबरोबर सुजाता आणि माझी आधीपण भेट झालेली असल्यामुळे चांगली ओळख होती. त्यांचा चार वर्षांचा मुलगा अथर्व पण बरोबर होता, त्यामुळे फायरवर्क सुरू होईपर्यंतचा वेळ चांगला गेला.
 |
| सौ. व श्री. खोपडे ह्यांच्याबरोबर |
 |
| फायरवर्कची वाट पाहताना |
पार्कच्या ह्या बाजूला सुद्धा काही फूडट्रक्स होते. तिथेच एका बाजूला अल्फारेट्टा सिटी बँड चालू होता. ते देशभक्ती धून वाजवत होते. त्यानंतर काही लोकल बँड्सचे कार्यक्रम होणार होते. लहान मुले, मोठी माणसे उत्साहाने इकडे तिकडे फिरत होती. काही फेरीवाले मुलांसाठी सेलवर चालणाऱ्या इल्युमिनेटेड रिंग्ज, बॉल्स आणि ट्यूब्ज अशा वस्तू विकत होते. थोड्या वेळाने मी आणि प्रसन्न फूडट्रक्सवरून खाण्यासाठी काही घेउन आलो. गिरीश सुद्धा डासांचे क्रीम आणण्यासाठी गेला होता, येताना तो पण काही खायला घेऊन आला. गप्पा मारत, खात पित फायरवर्कची वेळ झाली. सर्वत्र भटकणारी मंडळी आता एकाच दिशेकडे डोळे लावून होती. आणि सू र् र् र् र् करून आकाशात काही राॅकेट्स उडालेली दिसली. सुरुवातीला सावकाश एकापाठोपाठ एक रॉकेट येऊन आकाशात सुंदर आतीषबाजी करत होते. हळूहळू त्यांचा स्पीड वाढत जाऊन एकाच वेळेस अनेक फटाके आकाशात येऊन सुंदर रंगीबेरंगी फुलांची उधळण सुरू झाली. अतिशय उत्साहाचे वातावरण होते, आणि त्यात ह्या आतीषबाजीची मनमोहक उधळण. कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते. जवळजवळ अर्धा तास हा कार्यक्रम चालू होता. अमेरिकेतल्या आमच्या वास्तव्यातील हा अजून एक अविस्मरणीय अनुभव. फायरवर्क संपले आणि सगळेजण आपापल्या घरी निघाले. एवढ्या गर्दीतून पार्किंगमधून गाडी काढायची म्हणजे एक सर्कसच. पण परत एकदा इथल्या शिस्तीचा फायदा झाला. दोन बाजूंना पार्क केलेल्या गाड्यांना बाहेर पडून मेन ट्रॅकवर येऊन देण्यासाठी गाड्या थांबून वाट करून देत होत्या. कुठेही मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे नाही की घुसाघुशी नाही. त्यामुळे हळुहळु का होईना, पण ट्रॅफिक पुढे सरकत होता.
 |
| फूडट्रकच्या रांगेत प्रसन्न आणि अथर्व |
 |
| फायरवर्क |
 |
| फायरवर्क |
आम्ही पाहिलेले अल्फारेट्टाजवळचे अजून एक सुंदर ठिकाण म्हणजे लेक लॅनीअर. आता इथे रात्री ९ च्या सुमारास सूर्यास्त व्हायला लागला होता. असेच एक दिवस मुलं आॅफिसमधून आली आणि आम्ही भटकायला म्हणून ह्या लेक लॅनीअरला आलो. आमच्या घरापासून पाऊण एक तासावर हे मॅन मेड लेक आहे. चट्टाहूची नदीवर बफोर्ड धरण बांधल्यावर हा जलाशय (Reservior) निर्माण केला गेला. ह्यात चेस्टाटी नदीचे पाणी पण सोडले जाते. ह्या जलाशयाचा एरीया अदाजे ३७००० एकर्स एवढा मोठा आहे. इथे खूप मोठा बीच तयार केला आहे. खूप फॅमिलीज दिवसभर पिकनिकसाठी इथे येतात. अमेरीकन मंडळी इतकी हौशी आहेत, की आम्ही गेलो तेव्हा एका बाजूला एक ग्रुप मोठा पोर्टेबल तंदूर पण घेऊन आला होता. घरून डबे घेऊन येणारी पण मंडळी होती. आईबाबा आपल्या लहान मुलांना घेऊन पाण्यात डुंबत बसले होते. समोरच्या किनार्यावर बोटींगची पण सोय होती. समोरचा किनारा तर इतका सुंदर दिसत होता. आम्ही तासभर टाईमपास केला आणि निघालो.
 |
| लांबवर पाऊस पडतानाचे दृष्य |
 |
| सुंदर लेक लॅनियर |
अल्फारेट्टामध्ये एक्सरसाईज म्हणून फिरणाऱ्यांसाठी, जॉगिंग करणाऱ्यांसाठी, सायकलींग करणार्यांसाठी बिग क्रिक ग्रीनवे हा सगळ्यात आवडता ट्रेल आहे. ६ मैल लांबीच्या ह्या ट्रेलवर जाण्यासाठी शहराच्या पाच-सहा ठिकाणांहून प्रवेश आहेत. लोकं आपापल्या गाड्या बाहेर लावतात आणि आत जाऊन फिरून येतात. आतल्या ट्रेलची कामे अजून चालू आहेत. संपूर्ण रस्त्याचे कॉंक्रीटीकरण होणार आहे. बर्याच ठिकाणी नाल्यांवरून लाकडी ब्रीज आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाडे आहेत. प्रत्येक झाडाजवळ त्याच्या वर्णनाच्या पाट्या लावल्या आहेत. पॉयझन आयव्हीजवळ धोक्याची सूचना पण लावली आहे. आम्ही गेलो तेव्हा सर्व झाडे हिरवीगार होती. पण विंटरमध्ये छान रंगीबेरंगी दृश्य असते असे म्हणतात. ट्रेलवर थोड्या थोड्या अंतरावर बसण्यासाठी बाकडी आहेत. आम्हाला चालताना रस्त्यावर सापसुद्धा दिसले. हरणे तर अल्फारेट्टामध्ये कधीही कुठेही दिसतात. मिल्टन, अल्फारेट्टाच्या नगररचनेत ह्या बिग क्रिक ग्रीनवेचे एक विशेष स्थान आहे.
 |
| बिग क्रिक ग्रीनवे |
इथे
पार्क्स, ट्रेल्स, मॉल्समध्ये जायचे तर मुलांच्या वेळा बघूनच जावे लागायचे. कारण ह्या सगळ्या गोष्टी चालण्याच्या अंतरावर नाहीत. आणि इथल्या कडक शिस्तीत गाडी चालवणे माझ्यासारख्या पुणेकराला जमण्यासारखे नव्हते. उबेरचा पर्याय होता, पण मी तो टाळला. एनीवे, पार्क्स, ट्रेल्स, मॉल्स ह्यांनी सुसज्ज असे हे अल्फारेट्टा शहर खरेतर तसेही अतिशय सुंदर आहे. घराजवळ फिरायला बाहेर गेलो तरी मस्त वाटायचे. सुंदर आणि स्वच्छ रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे, फुटपाथवर मध्यभागी वॉकिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूला वेल-मेन्टेन्ड हिरवळ, फुटपाथच्या बाजूला छोटी छोटी सुंदर फुलझाडे, रस्ता क्रॉस करताना चालणाऱ्यास प्राधान्य देऊन गाड्या थांबून राहणे, हे सगळंच विलक्षण होतं. बहुतेक वेळा मी आणि सुजाता बरोबरच फिरायला जायचो. पण कधीतरी मी एकटाच बाहेर पडलो तरी ह्या सुंदर वातावरणात कधी कंटाळा नाही यायचा. स्वच्छ हवेत तासभर फिरून आलं की कसं फ्रेश वाटायचं.
 |
| फूटपाथच्या कडेचे सुशोभीकरण |
 |
| फूटपाथच्या कडेचे सुशोभीकरण |
 |
सुंदर फुटपाथ
|
अमेरिकेतील वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी बॅगा वगैरे भरून झाल्यावर जेवायला इंचीन नावाच्या इंडियन हॉटेलमध्ये जायचे ठरले. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे आधी जवळच्याच कॉगबर्न पार्कमध्ये टाईमपास करून पुढे जायचे ठरले. एकदा असेच जाताजाता बाहेरूनच हा पार्क बघून गेलो होतो. मोठे लॉन, आणि बाजूने जॉगिंग ट्रॅक, साईडला एक झिगझॅग घसरगुंडी, आणि बसायला कव्हर्ड बेंचेस,
बस्स एवढंच. आम्ही गेलो तेव्हा तिथे छोटी छोटी मुले ट्रॅकवर छोट्या सायकली चालवत होते. आईबाबा लहान बाळाला लॉनवर खेळवत होते. काही मोठी माणसे ट्रॅकवर चकरा मारत होते. आम्ही पण एकच चक्कर मारली. थोडा वेळ बाजूच्या बाकड्यावर बसलो आणि निघालो. पार्कमध्ये थोडाच वेळ होतो, पण आम्हाला हा पार्क आवडला. फार गर्दी नाही, फार मोठा नाही.
लहान मुलांना खेळायला घेऊन जायला एकदम आयडियल. अमेरिकेत पहील्या दिवशी मोठ्या विल्स पार्कमध्ये होतो, आणि शेवटच्या दिवशी ह्या छोट्या कॉगबर्न पार्कमध्ये.
 |
| कॉगबर्न पार्क जॉगिंग ट्रॅक |
 |
| हिरवीगार कॉगबर्न पार्क |
No comments:
Post a Comment