काल पावसामुळे थोडी गडबड झाली होती, त्यामुळे प्लॅन थोडे बदलावे लागले होते. आज तर इथला शेवटचा दिवस होता. काय काय बघून झाले आणि काय काय बघायचे राहिले ह्याचा प्रसन्नने आढावा घेतला. तो ह्याआधीही इथे येऊन गेला असल्यामुळे त्याला सगळी ठिकाणे माहित होती. फ्लाईट रात्री ९.३० वाजता होती, त्यामुळे आख्खा दिवस हातात होता. मोबाईलवर आज हवामान स्वच्छ असल्याचे दिसत होते. मग ठरले की आधी मॅडम तुस्साड्स वॅक्स म्युझियम बघायचे, आणि नंतर वेळ मिळाला तर चायना टाऊनला चक्कर मारायची. म्युझियमच्या वेळा बघितल्या आणि १०.३० वाजताची ऑनलाईन तिकिटे काढली. परत येईपर्यंत ४ तरी वाजतील असा अंदाज असल्यामुळे सगळ्या बॅगा वगैरे भरल्या. रूममध्ये काही राहिले नाही ना ह्याची खात्री केली आणि हॉटेल चेक आऊट करून बॅगा हॉटेलच्या क्लोकरूममध्ये ठेवून मॅडम तुस्साड्स वॅक्स म्युझियमला आलो.
म्युझियम पाच मजली असल्यामुळे जेवढे मजले जमतील तेवढेच बघायचे ठरले. संपूर्ण ट्रिपमध्ये प्रसन्न दिपालीने एक ठरवले होते की आम्हाला झेपेल एवढेच फिरायचे. अमेरिकेला यायच्या आधी मी आमच्या दोघांच्या सगळ्या मेडीकल टेस्ट करून घेतल्या होत्या आणि रिपोर्ट्स बरोबर घेऊन आलो होतो. त्यामुळे त्या दोघांना आमच्या तब्येतींची पूर्ण कल्पना होती. कुठेही फिरताना त्या दोघांपैकी एकजण तरी आमच्याबरोबर असायचा. नॉर्मली दीपाली सुजाताला बरोबर घेऊन असायची, आणि मी आणि प्रसन्न थोडे भरभर बघत पुढे जायचो. एनीवे, म्युझियमच्या आत गेलो आणि तिथे लिफ्ट आहे हे बघून आमचा जीव भांड्यात पडला. मग आम्ही लिफ्टमधून एकदम वरच्या मजल्यावर गेलो आणि तिथून म्युझियम बघायला सुरुवात केली. काय अप्रतिम आणि हुबेहूब पुतळे होते. इथे भरपूर फोटो सेशन झाले. एवढ्या मोठमोठ्या पुढाऱ्यांबराबर किंवा सेलिब्रेटीजबरोबर फोटो काढण्याची संधी कोण चुकवणार ना. मी पहिला फोटो जेनिफर लोपेझबरोबर काढला तेंव्हा सुजाता थोडी नाराज झाली, हे काय लहान मुलांसारखे करता म्हणून. पण प्रसन्नने तिला समजावले आणि ती पण फोटो काढायला सरसावली. मी तर ठरवलेच होते की एवढ्या लांब आलोय तर पूर्ण एन्जॉय करायचे. गांधीजी, नेल्सन मंडेला, दलाई लामा, पोप बेनेडिक्ट, बिल क्लिंटन, ओबामा पतीपत्नी, टायटॅनिकच्या लिओनार्डो डिकॅप्रिओ, जेनिफर लोपेझ, मायकेल जॅक्सन, चार्ली चॅप्लिन, स्टीव्हन स्पीलबर्ग, फुटबॉल प्लेअर मेस्सी आणि अशा कितीतरी व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे इथे आहेत. स्टीव्हन स्पीलबर्गचा पुतळा तर किती बारकाईने केला आहे. मला हा पुतळा सगळ्यात जास्त आवडला.
 |
| जेनीफर लोपेझ |
 |
| गांधीजी |
 |
| मेस्सी |
 |
| दलाई लामा |
 |
| स्टीव्हन स्पीलबर्ग |
ह्या सुंदर पुतळ्यांबरोबरच व्हाईट हाऊसचे प्रेस डेस्क, टी.व्ही. चॅनेलची डिस्कशन रूम, म्युझिक ड्रम वगैरे गोष्टी पण फोटोची हौस असणाऱ्यांसाठी ठेवल्या होत्या. खूप छान आणि मजेत वेळ चालला होता. इथले मुख्य अॅट्रॅक्शन तर पुढेच होते, ते म्हणजे फोर डी मुव्ही सुपर हिरो. मी थ्री डी मुव्हीज बघितलेत, पण फोर डी इथे पहिल्यांदा पाहिला. ह्याचा इफेक्ट एकदम वेगळाच. ती फेकलेली डिस्क समोरून येते अगदी आपल्या कानाजवळून आपल्यामागे जाते, पावसाचे शिंतोडे आपल्या अंगावर पडतात, हे आणि असे अनेक मॅजिकल अनुभव हा मुव्ही बघताना येतात. खूप भारी वाटते.
 |
| प्रेसिडेंट दीपाली |
 |
| टी व्ही वर मुलाखत घेताना |
म्युझियम पाहून बाहेर आल्यावर घड्याळ पाहिले. भरपूर वेळ होता. त्यामुळे लगेचच चायना टाऊनला गेलो. ह्या चायना टाऊनचे वैशिष्ट्य म्हणजे इथे रस्त्याची नावे, दुकानांच्या पाट्या, सगळे काही चिनी भाषेत होते. आपल्या तुळशीबागेतल्या छोट्या छोट्या दुकानांसारखी छोटी छोटी दुकाने इथे होती, बहुतांशी स्पेशली बायकांसाठीच. एव्हाना दीड वाजले होते, आणि आता सगळ्यांना पोटात कांव कांव ऐकू यायला लागली होती. जवळपास चांगले हॉटेल शोधता शोधता एका गल्लीसमोर वेलकम टू लिटल इटली ही कमान दिसली. तिथल्याच एका जुन्या स्टाईलच्या इटॅलियन हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. महाबळेश्वरला हॉटेल्स असतात साधारण त्या टाईपचा लूक बाहेरून होता. एंट्रीला दुकान आणि पुढे गल्ला. आतमध्ये वाडयामध्ये हॉटेल. मालकाने बहुधा स्वतःच्या घरातच हे हॉटेल चालू केले होते. भाऊ बहीण स्वतः आॅर्डर घेत होते. बिलींग आणि कॅश पण घरचाच माणूस. लज्जतदार आणि ऑथेंटिक इटॅलियन लझानिया कसा असतो हे तिथे कळाले. त्यावर प्रसन्नचा आवडता चीज केकपण झाला. पोटपूजा झाली आणि हॉटेलबाहेर आलो, आपल्याकडे कुल्फीच्या गाड्या असतात तशा इथे आईस्क्रीमच्या गाड्या होत्या. त्यातल्या एका गाडीवर इटॅलियन आईस्क्रीम आम्ही घेतले. फारच वेगळे आणि मस्त होते. मग त्या इटॅलियन गल्लीतून बाहेर पडलो. तिथे बऱ्याच दुकानांत दहा डॉलरना तीन टीशर्ट अशा पाट्या दिसत होत्या. बघू तर कसे आहेत म्हणून एका दुकानात शिरलो, आमच्या संभाषणावरून आम्ही भारतीय आहोत हे दुकानदाराने बरोबर ओळखले आणि तो पण आमच्याशी अस्खलित हिंदीत बोलायला लागला. त्याच्याकडे तो कुठल्या गावाचा वगैरे चौकशी केली तर तो बांगलादेशी निघाला. गोड गोड बोलून शेवटी एक सेट त्याने गळ्यात मारलाच. भारतात परतल्यावर पहिल्याच धुण्यात त्याची अगदी अपेक्षेप्रमाणे काय अवस्था झाली हा भाग निराळा.
 |
| टिपिकल चायनीज शॉप |
 |
| चायना टाऊन गल्ली |
 |
| लिट्ल इटॅली |
आता अॅटलांटा परतीची वेळ झाली होती. उबेर टॅक्सीत बसलो आणि हॉटेलला निघालो. ड्रायव्हरची एवढी बडबड चालली होती की हॉटेलजवळ आल्यावर वनवेच्या गोंधळात तो थोडा गडबडला. मग आम्ही तिथेच एका कोपर्यावर टॅक्सी थांबवली आणि उतरलो. प्रसन्न दीपाली तिथून बॅगा आणायला हॉटेलला गेले आणि आम्ही दोघे पाथ मेट्रो स्टेशनबाहेर जाऊन बसलो. मी आणि प्रसन्नने पाथ स्टेशन आधी पाहिले होते, पण सुजाता आणि दीपाली पहिल्यांदाच ते बघत होत्या. त्या सुंदर स्टेशनवरून सुंदर मेट्रोने परत पेन स्टेशनला आलो. स्टेशनबाहेर बस पकडली आणि नेवार्क एअरपोर्टवर आलो. दीपालीचे काका काकी न्यूजर्सीमध्येच होते. ते त्यांच्या छोट्या मुलाबरोबर एअरपोर्टला भेटायला आले. थोडा वेळ गप्पा आणि कॉफी झाली, आणि आम्ही कस्टम चेक इनला निघालो. प्रसन्नने कसली तिकिटे काढली होती काय माहित, पण आम्हाला कुठेही मोठ्या रांगेत उभे न राहता कस्टम चेकला डायरेक्ट जायला मिळत होते. चेकींग झाल्यावर आम्ही बोर्डिंग गेटजवळ जाऊन बसलो. नेहमीप्रमाणे प्रसन्न दीपाली जाऊन जेवण घेऊन आले.
जेवण झाले, ९.३० वाजून गेले तरी बोर्डिंगचा काही पत्ता नव्हता. एवढ्यात अनाउन्समेंट झाली. विमानातील सिट्सपेक्षा जास्त तिकिटे विकली गेल्यामुळे ज्या प्रवाशांना दुसर्या दिवशी जाणे शक्य असेल त्यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली गेली. ह्या प्रवाशांना रात्री हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आणि दोनशे डॉलर कॉम्पेन्सेशन देण्यात येणार होते. उद्या मुलांचे आॅफिस असल्याने आम्ही तो विचारसुद्धा करू शकत नव्हतो. पाचच मिनिटात पुढची सहकार्याबद्दल आभाराची अनाउन्समेंट झाली. त्यांच्या अनाउन्समेंटला भरपूर रिस्पॉन्स मिळाला होता. इन फॅक्ट काही जण चान्स गेला म्हणून निराश होऊन परतले होते. ह्या सगळ्या घडामोडींनंतर एकदाचे विमानाने अॅटलांटाकडे उड्डाण केले. अॅटलांटा एअरपोर्टवर उतरल्याबरोबर कार घ्यायला बाहेर पडलो. विमानतळावर सगळीकडे मार्गदर्शक बोर्ड इतके होते की कोणालाही न विचारात बरोबर त्यांच्या शटल सर्व्हिस काउंटरजवळ पोचलो. योगायोग म्हणजे ज्या लेडीने आम्हाला पार्किंगपासून आणले होते, तिनेच आत्ता आम्हाला गाडीजवळ नेऊन सोडले. पार्किंगची इथली व्यवस्था फारच सिस्टिमॅटिक होती.
झालं, संपली आमची नायगारा-न्यूयॉर्क ट्रिप इथे. पाच दिवस कसे भराभर निघून गेले. मुलं बरोबर असली की किती फ्रेश वाटतं. कितीही पळापळ झाली तरी काही वाटत नाही. ही ट्रिप म्हणजे मुलांनी आम्हाला दिलेली एक अमूल्य अशी अविस्मरणीय भेट होती.
No comments:
Post a Comment