अमेरिकेत मी आणि सुजाता पहिल्यांदाच आलो होतो. आल्या आल्या नेहमीप्रमाणे मुलांसाठी कोणी कोणी काय काय पाठवले होते ते देऊन झाले. कितीही मोठी झाली तरी खाऊ आणि भेटवस्तू मिळाल्या की मुले खुश होणारच. माझ्यासाठी कोणी काही आणले तर मी अजूनसुद्धा खुश होतो, फक्त दाखवता येत नाही एवढेच. बॅगेत काय काय आहे हे बघतानाच प्रसन्न दीपाली इथले प्लॅन्स सांगत होते. नायगाराला खूप थंडी असेल, त्यासाठी मी आणि सुजाताने आणलेले स्वेटर आणि शाल पुरेसे नाहीत असे त्यांचे म्हणणे पडले. त्यांच्या मते न्यूयॉर्कला खूप चालावे लागेल, आणि त्यासाठी माझे लेदर शूज काही कामाचे नव्हते. मग काय, लगेच पहिल्याच रविवारी आमची अमेरिकेतील पहिली खरेदी करायची ठरली. सकाळी ब्रेकफास्ट करून प्रथम जवळच्याच विल्स पार्कला फिरायला गेलो. पार्कमधून बाहेर पडल्यावर चला आता आपण कंपन्यांचे आऊटलेट्स असलेल्या एका मोठ्या मॉलला जाऊ म्हणून प्रसन्न आम्हाला एका लॉंग ड्राईव्हला घेऊन निघाला.
अल्फारेट्टाबाहेर बरेच लांब आल्यावर आम्ही एका ठिकाणी पोचलो. तिथे एका रांगेत बरीच दुकाने दिसत होती. प्रसन्नने गाडी पार्क केली आणि आम्हाला उतरायला सांगितले. मी म्हटलं अरे आपल्याला मॉलला जायचंय ना? बाबा हाच तो मॉल हे उत्तर ऐकून मी चक्रावलो. मला आपले पुण्यामुंबईतले उंच बिल्डिंगमधले मॉल बघायची सवय, थोड्या जागेत भरपूर दुकाने. आणि इथे भरपूर मोठ्या मोकळ्या जागेत, प्रशस्त बैठ्या बिल्डिंग्जमधली ही दुकाने असलेले हे विस्तीर्ण मॉल्स. खुपच वेगळे वाटले. आम्ही आत्ता आलो होतो तो नॉर्थ जॉर्जिया प्रिमियम आऊटलेट मॉल. प्रशस्त पार्किंग, स्वच्छ सुंदर रस्ते, जागोजागी हिरवीगार वर्तुळाकार कट केलेली बुशेस, आजूबाजूला रंगीबेरंगी फुलझाडे, मोठ्या लांबलचक बिल्डिंगमध्ये थाटलेली विविध कंपन्यांची आकर्षक दुकाने, शहरापासून लांब असल्याने फक्त खरेदी करण्यासाठीच आलेल्या लोकांमुळे कमी गजबजाट, स्वच्छ मोकळी हवा, अजून काय पाहिजे. अनाकलनीय अमेरिकन अॅक्सेंटमुळे सगळ्या दुकानांत विक्रेत्यांबरोबर बोलायचे काम प्रसन्न दीपालीनेच केले. त्यांनी स्केचर्समधून आमच्या दोघांसाठी वॉकिंग शूज घेतले. खरोखर ह्याच शूजमुळे आम्ही पुढे अमेरिकेत खूप चालू शकलो. माझ्यासाठी कॅप आणि सुजातासाठी स्वेटर पण घ्यायचा होता. पण डिझाईन, साईझ आणि किंमत ह्यांचा मेळ काही जमेना. प्रसन्न दीपाली म्हणायचे की बाबा किंमत बघू नका. पण मी प्रत्येक गोष्ट रुपयात कन्व्हर्ट करून बघायचो, आणि अबब म्हणून माझा नकाराधिकार वापरायचो. फिरून फिरून आता भूक लागली होती. मग तिथल्याच कँटीनमध्ये आम्ही जेवण केले आणि घरी परतलो.
 |
| जॉर्जिया प्रिमियम आऊटलेट मॉल बाहेर |
 |
| जॉर्जिया प्रिमियम आऊटलेट मॉल |
 |
| लेडीज शोरूम मध्ये |
इथे अमेरिकेत आल्यानंतर काहीही खरेदी करायची असेल तर आम्ही जवळपासच्या मॉल्समध्येच जात होतो. छोट्या छोट्या वस्तू मुले बहुतेक वेळा आॅफिसमधून येतानाच घेऊन यायची. पण कधीकधी त्यांचा फोन यायचा की आईबाबा तयार रहा, आम्ही पाच वाजता येतोय, आपल्याला कॉस्टकोला जायचंय, किंवा वॉलमार्टला जायचंय. कॉस्टको येथे सगळ्या वस्तू होलसेलमध्ये मिळतात. महिन्याभरासाठी लागणार्या बहुतेक वस्तू इथली मंडळी ह्या कॉस्टकोमधूनच घेतात. इथे खूप मोठ्या मोठ्या आणि उंचच उंच रॅक्समध्ये वस्तूंचे गठ्ठेच्या गठ्ठे ठेवले होते. अगदी पाण्याची बाटली घ्यायची तरी कमीतकमी पन्नास बाटल्यांचा पॅक होता. प्रत्येक प्रकारच्या वस्तूंसाठी वेगवेगळे विभाग होते. एका बाजूला कोल्ड स्टोरेज होते. दुधाचे कॅन्स किंवा ज्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायला लागतात अशा वस्तू इथे होत्या. आम्ही आत गेलो, पटकन दुधाचे कॅन्स घेऊन ह्या फ्रिजसारख्या थंड खोलीमधून बाहेर पडलो. ह्या कॉस्टकोची वार्षिक मेंबरशीप फी पण असते. प्रत्येक खरेदीवर काही पॉईंट्स मिळतात. वर्षभर जे पॉइंट्स जमा होतात त्या प्रमाणात आपल्या बँक खात्यात डायरेक्ट कॅश जमा होते. कॉस्टकोच्याच कँपसमध्ये त्यांचा पेट्रोल पंप आहे. त्यांच्या मेंबर्सना इथे डिस्काउंट रेटमध्ये पेट्रोल पण मिळते. ह्या कॉस्टकोचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे फूड आयटेम्सचे फ्री टेस्टींग काऊंटर असतात. चव आवडली तर विकत घ्या नाहीतर पुढे जा. हे अमेरिकन सगळ्या काऊंटरवरच्या वस्तू अगदी हक्काने मागून खायचे, आणि विकत न घेता पुढे जायचे. मी आणि सुजाताला एखादी गोष्ट विकत घ्यायची नसेल तर उगाचच हे टेस्टींग कशाला करायचे असे वाटायचे. पण नंतर आम्हीसुद्धा हळूहळू अमेरिकन बनत गेलो.
 |
| कॉस्टको |
 |
| कॉस्टकोचा पेट्रोल पंप |
बहुतेक महिन्याभराचे सामान भरून झाल्यावर रोजच्या वापराच्या किंवा अन्य सुट्ट्या वस्तू घ्यायच्या असतील तर मग वॉलमार्ट झिंदाबाद. वॉलमार्टला सर्व वस्तू इतर मॉल्सच्या तुलनेत स्वस्त दरात मिळतात. आणि वॉलमार्टला काही मिळत नाही असे पण होत नाही. अल्फारेट्टामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, लहान मुलांची खेळणी आणि ड्रेस, फर्निचर, आॅफिस स्टेशनरी, होम गुड्स ह्यासाठी वेगवेगळे मॉल्स असले तरीही ह्या सर्व वस्तू वॉलमार्टमध्ये पण मिळतात. भाजीपाला, फळे, ग्रॉसरी, कॉस्मेटिक्स, मेडिसिन्स अशा पटकन घ्यायच्या वस्तूंसाठी चोवीस तास उघडे असणारे वॉलमार्टच. वर्षातले अगदी मोजके ३-४ दिवस सोडून बारा महिने चोवीस तास हा मॉल चालू असतो. इंडिपेंडन्स डे ला रात्री बारा वाजता घरी यायला उशीर झाला होता तेंव्हा मॅकडोनाल्ड सोडून सगळी हॉटेल्स बंद झाली होती. मॅकडोनाल्डला पण भली मोठी रांग लागली होती. त्यामुळे त्यारात्री आम्ही वॉलमार्टमधूनच काही फुड आयटेम्स घेऊन भूक भागवली होती. वॉलमार्टमध्ये कॅश काउंटरवर काही भारतीय मंडळी पण काम करताना दिसतात. त्यांच्याशी हिंदीतून गप्पा मारायला बरे वाटते. मराठी माणूस मात्र कधी कुठल्या काउंटरवर दिसला नाही.
 |
वॉलमार्टमधील कॅक्टसची व्हरायटी
|
 |
| वॉलमार्टमधील कॅक्टसची व्हरायटी |
कधीकधी मला राहून राहून प्रश्न पडायचा की काहीही खरेदी करायची असेल तर प्रत्येक वेळेस आपण मॉल्समध्येच जातो, आपल्यासारखी भाजी मंडई वगैरे इथे आहे का नाही? प्रसन्नला मी हे विचारले तेव्हा एका रविवारी सकाळी तो आम्हाला अल्फारेट्टा डाऊनटाऊनच्या फार्मर्स मार्केटला घेऊन गेला. इथे दर शनिवारी आणि रविवारी आसपासच्या शेतकर्यांचे स्टॉल्स उभे असतात. ताजी भाजी, फळे, फुले, व्हेज नॉनव्हेज खायच्या वस्तू, फ्रेश चीज वगैरे सर्व काही इथे उपलब्ध होते. खूप फॅमिलीज पिशव्या भरभरून आठवड्याची खरेदी करत होत्या. प्रसन्न दीपाली प्रत्येक वस्तूची चव घेऊन एखाद दुसरी वस्तू घेत होते. एखादी गोष्ट खूप आवडली तर सुजाताला बोलवून तिला पण चव घ्यायला सांगत होते. स्टॉलमालकसुद्धा उत्साहाने त्या वस्तूंचे वर्णन सांगत होते. शेतकऱ्यांनाही शहरात माल विकता यावा म्हणून किती छान सोय होती ही.
 |
| अल्फारेट्टा फार्मर्स मार्केट |
 |
| अल्फारेट्टा फार्मर्स मार्केट |
 |
| अल्फारेट्टा फार्मर्स मार्केट |
अल्फारेट्टामध्ये आम्ही पाहिलेल्या अन्य काही ठळक मॉल्समध्ये नॉर्थ पॉईंट मॉल, अॅव्हेलॉन, बेस्ट बाय, बेबीज आर अस, होल फुड मार्ट, चेरीयन्स, टार्गेट आणि पब्लिक्स ह्यांचा विशेष करून उल्लेख करावा लागेल. ह्या बहुतेक सगळ्या मॉल्सच्या अमेरिकेत किंवा जगभरात चेन्स आहेत. आम्ही
नॉर्थ पॉईंट मॉलला मुख्यतः मॅसीज हा जगप्रसिद्ध मॉल पाहण्यासाठी गेलो. मॅसीज, दिलार्ड्स, जे. सी. पेनी, सीयर्स, व्हॉन मौर हे ह्या नॉर्थ पॉईंट मॉलचे मुख्य प्रवर्तक. मॅसीजमध्ये सगळ्या मोठ्या ब्रॅण्ड्सचे गारमेंट्स, किचनवेअर, फर्निचर उपलब्ध आहे. मोठ्यामोठ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स २० टक्के ते ५० टक्केपर्यंत सेल चालू होते. दिपालीकडे मॅसीजची डिस्काउंट कूपन्सपण होती. डिस्काउंट कूपन्स आणि सेलचे कॉम्बिनेशन करून ३६० डॉलरचा कॅल्फेलॉन कंपनीचा नॉनस्टिक सेट मुलांनी १८० डॉलरमध्ये घेतला. आईसाठी गिफ्ट म्हणून केलेली ही इथली पहिली खरेदी. मॅसीज बघून झाल्यावर बाहेर पडलो आणि तिथेच फूडकोर्टमध्ये जेवण करून खाली उतरलो. खाली अमेरिकन गर्ल नावाची शोरूम होती. इथे लहान मुलींसाठी खूप सुंदर सुंदर बाहुल्या आणि बाहुल्यांच्या अॅक्सेसरीज होत्या. फक्त बाहुल्यांसाठी एवढी मोठी शोरूम मी पहिल्यांदाच बघत होतो.
 |
| नॉर्थ पॉईंट मॉल मध्ये |
अल्फारेट्टामध्ये काही स्पेशलाईझ्ड मॉल्स आहेत. बेस्ट बाय हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. फ्रिज, टीव्ही पासून ते मोबाईल, कॉम्प्युटर पर्यंत इलेक्ट्रॉनिक्समधील सर्व प्रकारच्या वस्तू इथे मिळतात. बेबीज आर अस आणि बाय बाय बेबी हा असेच फक्त लहान मुलांच्या वस्तूंसाठीचे मॉल. मुलांची खेळणी, मुलांचे ड्रेसेस, मुलांसाठी फर्निचर ह्याच्या असंख्य आणि सुंदर व्हरायटीज इथे आहेत. इथले असेच एक लोकप्रिय दुकान म्हणजे डॉलर ट्री. ह्या डॉलर ट्री मध्ये एक डॉलर आणि कमी किमतीच्या वस्तू मिळतात. मुलांच्या वाढदिवसासाठी, किंवा छोट्या छोट्या घरगुती पार्ट्यांसाठी लागणार्या डेकोरेशनच्या वस्तू, ख्रिसमस ट्री वर लावायच्या गिफ्ट्स, आणि अशा अनेक गोष्टी इथे आहेत.
 |
| बायबाय बेबी |
 |
| छोट्या मुलांचे फर्निचर |
अल्फारेट्टामधील बागा आणि मार्केट्स ह्यांच्याबद्दल मी एकत्र लिहायला सुरुवात केली होती. पण दोन्ही विषय एवढे वाढायला लागले की शेवटी हे दोन्ही विषय मला वेगवेगळे करावे लागले.
No comments:
Post a Comment