आमचे हॉटेल न्यूयॉर्क मॅरीयट डाउनटाउन, वन वर्ल्ड ऑब्झरवेटरीपासून पाचच मिनिटावर होते. सकाळी सकाळी जाग आली तेव्हा स्वाभाविकपणे खिडकीतून बाहेर पाहीले. सगळ्या उंच उंच बिल्डिंग्ज दिसत होत्या. एका बाजूला बाहेरून संपूर्ण काचेची बिल्डिंग होती, त्यात आमच्या शेजारच्या बिल्डिंगचे रिफ्लेक्शन दिसत होते. समोर आमच्यापेक्षा एक लहान बिल्डिंग होती. डावीकडे जुन्या स्टाईलचे डिझाईन असलेली एक सुंदर बिल्डींग होती आणि त्यामागे दिसत होती ती उंचच उंच "दी" वन वर्ल्ड ट्रेंड सेन्टरची बिल्डींग. कसलं मस्त वाटत होतं. बेडवर पडल्या पडल्या अमेरिकेतली सगळ्यात उंच बिल्डिंग बघत होतो. आजचा प्रोग्रॅम तिथूनच सुरू होणार होता. तिथली ११.३० वाजताची तिकिटे बुक केली होती. त्यामुळे आवरायची काही घाई नव्हती. प्रसन्नने न्यूयॉर्क सिटीची हॉप-ऑन हॉप-ऑफ बसची तिकिटे ऑनलाईन काढली होती, पण ती सिटीतल्या त्यांच्या मुख्य ऑफिसमधून कलेक्ट करायची होती. प्रसन्न दीपाली जाऊन तिकीटं घेऊन येणार होते. म्हणजे वन वर्ल्ड ऑब्झरवेटरी बघून झाल्यावर आम्हाला तिथेच बसमध्ये चढून टूर जॉईन करता आली असती. पण ट्रिप सुरु झाल्यापासून ह्या दोघांची खूपच धावपळ चाललेली होती. म्हणून सुजाताने सांगितले की चौघेही बरोबरच सिटीला जाऊ आणि पहिल्या स्टॉपपासून टूर करू. त्यामुळे त्यांना पण आरामात आवरता आले. रूममध्ये कॉफी मेकर होताच. मी सुजाताने चहा आणि मुलांनी कॉफी घेतली. आंघोळी झाल्यावर थोडे स्नॅक्स घेऊन बाहेर पडलो.
 |
| हॉटेल रूमच्या खिडकीतून |
 |
| रूममधून वन वर्ल्ड सेन्टर |
बाहेर छान थंड हवा पडली होती, आणि उनही पडले होते. फिरायला मस्त वाटत होतं. वन वर्ल्ड ऑब्झरवेटरीच्या रस्त्यावरच बॉम्ब हल्ल्यात उध्वस्त झालेल्या ट्विन टॉवर्सचे स्मारक (ग्राउंड झीरो मेमोरियल) आहे. ह्या दोन टॉवर्सचे खड्डे सुंदरपणे बांधून काढून आतल्या बाजूने त्यांच्या भिंतीवर धबधब्याप्रमाणे पाणी सोडले आहे. बाहेरच्या बाजूला हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींची नावे ब्रॉंझ प्लेट्सवर कोरून बसवली आहेत. आजूबाजूला छोटीशी बाग आहे. आणि तिथेच पलीकडे एक छोटा रस्ता ओलांडून नविन उंच बिल्डिंग बांधली आहे. हिच ती अमेरिकेतील सद्ध्याची सर्वात उंच बिल्डिंग, वन वर्ल्ड ट्रेंड सेन्टर. ही बिल्डिंग १०४ मजली (प्लस जमिनीखाली ५ मजले) आहे. १००, १०१ आणि १०२वे मजले टुरिस्ट्ससाठी ठेवले आहेत. त्यासाठी वेगळे प्रवेशद्वार, वेगळी लिफ्ट आहे. आम्ही फिरत फिरत ह्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो. बरोबर ११.१५ वाजता आम्हाला आत सोडले. खालच्या मजल्यावर लिफ्टकडे जायच्या मार्गावर कन्स्ट्रक्शनचा थोडा इतिहास आणि काही क्लिप्स इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखवण्यात येत होती. पुढे १०२व्या मजल्यावर जाण्यासाठी ४ लिफ्ट्स आहेत. सिक्युरिटी स्टाफ सगळ्यांना शिस्तीत रांगेत उभे करत ग्रुप ग्रुपने आत सोडत होते. लिफ्टच्या आतल्या भिंतींवर बिल्डिंगवरून काढलेले फोटो आणि क्लिप्स इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दाखवण्यात येत होते. एका मिनीटात लिफ्ट १०२व्या मजल्यावर झटकन पोचलीसुद्धा. आणि लिफ्टचा एवढा वेग असूनही काहीही जाणवले नाही.

|
| ग्राउंड झिरो मेमोरियल |
 |
| वन वर्ल्ड सेन्टर. वर ज्या खिडक्या दिसत आहेत तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. |
 |
| लिफ्टकडे जाताना |
 |
| लिफ्टमध्ये |
लिफ्टमधून बाहेर पडलो आणि त्या उत्तुंग बिल्डिंगवरून बाहेरचे विहंगम दृश्य नजरेस पडले. अगदी विमानातून पाहतोय असे वाटत होते. तिथून जिन्याने खालच्या मजल्यावर आलो. इथे गर्दी होती तरीही फिरायला मोकळे वाटत होते. पूर्ण उंचीच्या काचेच्या खिडक्या होत्या. एवढ्या उंचीवर देखील काचा आतून बाहेरून चकाचक स्वच्छ होत्या. त्यामुळे फोटो काढताना काही प्रॉब्लेम आला नाही. काचेवरचे ग्लेअर संभाळून भरपूर फोटो काढले, व्हिडीओ क्लिप्स काढल्या. न्यूजर्सी आणि मॅनहॅटनचे दर्शन होत होते. दूरवर न्यूयॉर्क सिटीतल्या उंच बिल्डिंग दिसत होत्या. ब्रुकलिन ब्रिज, एलिस आयलँड, स्टॅच्यू अॉफ लिबर्टी दिसत होते. कालच जाउन आलो त्या फेरीबोट छोट्या छोट्या दिसत होत्या. इतक्या उंच बिल्डिंगवरून खालचे दृश्य पाहणे हा एक वेगळाच अविस्मरणीय अनुभव होता. तिथून खालच्या मजल्यावर आलो. ह्या मजल्यावर मोठा शॉपिंग स्टॉल आहे. नायगारा, स्टॅच्यू आॅफ लिबर्टीप्रमाणे मोमेंटो म्हणून वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
 |
| एलिस आयलँड |
 |
| ब्रुकलिन ब्रिज |
 |
| स्टॅच्यू ऑफ लिबर्टी |
 |
| न्यूयॉर्क सिटी |
ह्या बिल्डिंगमधून पाय निघत नव्हता. पण वेळेचे भान ठेवायलाच पाहिजे होते. अजून न्यूयॉर्क सिटी बघणे बाकी होते. त्यामुळे आता इथून आवरते घेत लिफ्टमधून परत खाली उतरलो. जवळच एक इंडियन हॉटेल होते. तिथे जेवण घेतले. रस्त्यावर खूप प्रवासी होते. पण नऊवारी साडी नेसलेल्या एक दक्षिण भारतीय आजी लक्ष वेधून घेत होत्या. जेवण झाल्यावर उबेर घेतली आणि मेन सिटी पहायला निघालो. बांगलादेशी ड्रायव्हर होता. ड्रायव्हिंग लायसन्स पुण्यात घेतल्यासारखी गाडी चालवत होता. ट्रॅफिक खूप होता, त्यामुळे हे असले बेशिस्त ड्रायव्हिंग आम्हाला लाभदायक ठरले आणि त्यामानाने लवकर सिटीमध्ये पोचलो. प्रसन्न तिकिटे कलेक्ट करून आणि बस कुठुन सुटते वगैरे चौकशी करून आला. जवळच टाईम्स स्क्वेअरच्या अलिकडेच बस उभी होती. कंडक्टरने वर जाऊन चार जणांना जागा आहे का बघून आम्हाला वर सोडले. गाईड वर आला आणि बस सुरू झाली. टाईम्स स्क्वेअरवरून बस पुढे निघाली. गाईडची कॉमेंट्री चालू होती. टाईम्स स्क्वेअरचे ते मोठे घड्याळ, पुढच्या त्या छोट्या छोट्या लेन्स, मॅसीजची लांबलचक मोठी बिल्डिंग, एम्पायर स्टेट बिल्डिंग, पुढे सेंट्रल कोर्ट, असे दाखवत दाखवत बस चालली होती. बसचे काही ठराविक स्टॉप्स होते. तिथे बस थांबत होती. काहीजण उतरत होते, काही चढत होते. पुढे चायना टाऊन, मॅनहॅटन, वन वर्ल्ड सेंटर, वॉल स्ट्रीटवरचा बुल दाखवत दाखवत बस जात होती. ब्रुकलिन ब्रिजच्या बाजूने बस घेत पुढे सेंट्रल पार्क, अॅपल स्टोअरवरून बस परत टाईम्स स्क्वेअरला आली. संपूर्ण न्यूयॉर्क सिटी ह्या बसमधून बघून झाली. पायी पायी, किंवा अन्य प्रकारे एवढ्या वेळात एवढे सगळे बघणे शक्य नव्हते.
 |
| टाईम्स स्क्वेअर |
 |
| एम्पायर स्टेट |
 |
| वॉल स्ट्रीट बुल |
परवा नायगाराला असताना दिपालीने पारूलला फोन केला होता. पारूल अभिषेकपण आज न्यूयॉर्कमध्येच त्यांची मॅरेज अॅनीव्हर्सरी सेलिब्रेट करायला आले होते. बसमधून उतरल्याबरोबर त्यांना फोन केला. ते दोघे मॅडम तुसाड्स म्युझियम बघून येत होते. ते येईपर्यंत समोर मॅकडोनाल्डमध्ये कॉफी चिप्स घेऊन टाईम्स स्क्वेअरच्या जिन्यांजवळ येऊन बसलो. पाचच मिनिटात ते दोघे पण आले. भारतापासून एवढ्या लांब घरची माणसे भेटल्यावरचा आनंद वेगळाच. गप्पाटप्पा झाल्या. ठाण्यात सुजाता आणि पारूलमध्ये एक वेगळाच बॉण्ड तयार झाला होता. बर्याच दिवसांनी भेटल्यावर त्यांच्या गप्पा रंगल्या. दीपालीपण त्यांना जॉइन झाली. अभिषेक त्यामानाने अबोल, पण ह्यावेळी चांगला बोलत होता. पुष्करची आणि त्याची गट्टी होती. पण प्रसन्नची आणि त्याची फार भेट झाली नव्हती. पण समवयस्क असल्याने ते दोघेपण मस्त गप्पा मारत होते. जसजशी रात्र होत चालली होती, तसतशी गर्दी वाढत चालली होती. एक रोड शो लोकांचे लक्ष वेधून घेत होता. मिकी आणि वेगवेगळ्या कार्टून्सच्या पेहरावातली माणसे नाचत होती. मुलं माणसं त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. फूडट्रक्सवर गर्दी झाली होती. आजुबाजुच्या दुकानांच्या लाइटिंगमुळे सगळीकडे झगमगाट होता. मुले, मोठी माणसे एंजॉय करत होते. एक वेगळेच भारावलेले वातावरण होते. थंडी वाढायला लागली, आणि आता काढता पाय घेण्याची वेळ आली हे लक्षात आले. नेहमीप्रमाणे मी आणि सुजाता एक टेबल पकडून बसलो, आणि हे चौघेजण काहीतरी खायला आणायला गेले. इथे एक मस्त सोय आहे. रस्त्याच्या मध्ये खूप टेबल खुर्च्या ठेवल्या आहेत. भटकून कंटाळा आला की बाजूच्या फूडट्रक्सवरून खायला घ्यायचे, आणि आजूबाजूची गंमत बघत एंजॉय करत बसायचे.
 |
| टाईम्स स्क्वेअरचा झगमगाट |
 |
| टाईम्स स्क्वेअरची कार्टून्स |
 |
| रिलॅक्स |
 |
| टाईम्स स्क्वेअरच्या पायऱ्यावर |
मुलं फलाफल आणि कोक घेऊन आली. अभिषेकचं काही पथ्य चालू असल्याने तो वेगळं खात होता. गप्पा मारत खाणं संपवलं आणि एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या हॉटेलला निघालो. ह्या वेळचा उबेरचा ड्रायव्हर आफ्रिकन होता. एका हातात कोकचा कप आणि तोंडाने अखंड बडबड चालली होती. आय लाइक इंडियन मुव्हीज वगैरे गप्पा मारत शेवटी हॉटेलला सोडले आणि त्याच्या टकळीतून आम्ही मुक्त झालो. रूमवर गेल्यावर प्रसन्नच्या मित्राचा फोन आला. पुण्याच्या कॉलेज फ्रेन्ड्सच्या क्लोज ग्रुपमधला हा त्याचा मित्र मामाबरोबर विकेंडसाठी न्यूयॉर्कला आला होता. झालं, बाबा, तुम्ही दोघे झोपा, आम्ही जाऊन येतो म्हणून एवढ्या रात्री प्रसन्न दीपाली टॅक्सीने परत टाईम्स स्क्वेअरला गेले. रात्री परत कधी आले आम्हाला काहीही कळले नाही एवढ्या गाढ झोपेत आम्ही होतो.
No comments:
Post a Comment