नायगारा-न्यूयॉर्क ट्रिपनंतर प्रसन्न दीपालीला मोठी अशी सुट्टी मिळणे अवघड होते. त्यामुळे अल्फारेट्टाबाहेरच्या ट्रिप्स फक्त शनिवार रविवारी, किंवा सुट्टीच्या दिवशीच जमणार होत्या. दोघेही ऑफिसमधून वेळेवर आले की जवळच्या पार्कमध्ये, किंवा हॉटेलमध्ये, मॉलमध्ये किंवा सिनेमाला घेऊन जायचे. कधी कधी शनिवार रविवारी सुद्धा प्रसन्नला ऑफिसच्या सपोर्टसाठी घरी थांबावे लागायचे. अशा वेळेस आम्ही अगदी जवळच्या मॉल किंवा वॉकिंग ट्रेलला जायचो, जेणेकरून ऑफिसमधून कॉल आला की दहा मिनिटात तो घरी येऊन मदत करू शकेल. सुदैवाने लगेचच घरी यायची वेळ कधीच आली नाही. कारण फोन आला की बहुतेक वेळा तो फोनवरच हे काम भागवत होता, मात्र घरी आल्या आल्या लॅपटॉप घेऊन कामाला लागायचा. आधी लिहिल्याप्रमाणे ह्या जोडीने आमच्या वास्तव्यातील ट्रिप्सचे प्लॅनिंग करून ठेवले होते. हवामान कसे आहे त्याप्रमाणे आयत्यावेळी थोडेफार बदल करून आम्ही फिरत होतो.
मिल्टनपासून अॅटलांटा हे जवळचे सर्वात मोठे शहर, खूप जुने. जॉर्जिया राज्याची ही राजधानी. त्यामानाने अल्फारेट्टा हे खूप नवीन, जॉर्जियातल्या फुल्टन कौंटीमधले एक उपनगर. बऱ्याच आयटी कंपन्या इथे यायला लागल्यात. त्यांच्यामुळे घरे, मॉल्स, शाळा, दवाखाने सगळे काही इथे आले. जसजशी वस्ती वाढायला लागली तसतशी अल्फारेट्टामधून मिल्टन, क्युमिन्स ही स्वतंत्र उपनगरे निर्माण झाली. प्रसन्न राहतो ते मिल्टन शहर तर आत्ता दहाच वर्षांपूर्वी, म्हणजे १ डिसेंबर २००६ रोजी अस्तित्वात आलेले. मिल्टन शहराची घरांची मर्यादा संपत आल्यावर क्युमिन्स हे शहर आता वेगाने वाढत आहे. इथे शहराच्या विकास आराखडय़ानुसार घरे बांधून झाली की अतिरिक्त नविन घरे बांधायला परवानगी मिळत नाही. राजकारण्यांच्या स्वार्थासाठी एफएसआय, टीडीआर वाढवणे वगैरे भानगडी इथे नाहीत. त्यामुळे सगळं कसं नीटनेटकं आणि सुटसुटीत वाटतं. अर्थात इथे जमीन पण मुबलक असल्यामुळे हे शक्य आहे.
असो, तर
मिल्टनपासून अॅटलांटा हे जवळचे सर्वात मोठे शहर. अॅटलांटातील मुख्य अॅट्रॅक्शन म्हणजे जॉर्जिया अॅक्वेरियम आणि त्याजवळची कोकाकोला फॅक्टरी. निघायच्या आधी प्रसन्नने अॅक्वेरियमची एंट्री तिकिटे आणि पार्किंग आॅनलाईन बुक करून टाकली. लंचनंतर कोकाकोला फॅक्टरीपण बघता यावी म्हणून सकाळी ९ वाजताच घरातून निघालो. आम्हाला वाटले होते की आपण खूप लवकर पोचू. पण तिथे गेल्यावर बघतो तर पार्किंगसुद्धा भरत आले होते एवढी गर्दी होती. पार्किंगमधून लिफ्टने खाली आलो आणि चालत चालत अॅक्वेरियमच्या गेटजवळ पोचलो. कुठल्यातरी शाळेची ट्रिप तिथे आली होती. आजी आजोबा आपल्या मुलां-नातवंडांना घेऊन वीकेंड एंजॉय करायला आले होते. आमच्यासारखे परदेशी प्रवासीपण खूप दिसत होते. गर्दी बरीच दिसत असली तरी रांग पटापट पुढे सरकत होती. आत गेल्याबरोबर प्रसन्नने कोणचा शो कुठे आणि किती वाजता आहेत ह्याची चौकशी केली. दोन्ही मुख्य शोज आॅलरेडी चालू झाले होते. मग आम्ही थोडा ब्रेकफास्ट केला आणि शोकेसमधले मासे पहायला सुरूवात केली. जगभरातील जवळपास पाचशेपेक्षा जास्त प्रकारचे छोटे ते अवाढव्य मासे इथे आहेत. पेंग्विन्ससाठी अतीथंड वातावरण ते समुद्रातील माश्यांसाठी साधारण तपमान असलेले विविध प्रकारचे विभाग इथे निर्माण केले आहेत. असे सांगितले गेले की दहा मिलियन गॅलनपेक्षा जास्त पाणी इथे ह्या माशांसाठी वापरले जाते. लुटुलुटु चालणारे पेन्ग्विन, वेगवेगळ्या प्रकारचे शार्क्स, सीहॉर्स आणि कितीतरी प्रकारचे मासे इथे आहेत.
 |
| पेंग्विन्स |
 |
| आतमध्ये जाऊन जवळून पेंग्विन्स पाहताना |
 |
| सुंदर माश्यांच्या शोकेसेस |
 |
| सीहॉर्स |
 |
| व्हाईट क्रोकोडाईल |
अॅक्वेरियमचे मेन अॅट्रॅक्शन डॉल्फिन शोची वेळ जवळ आली आणि आम्ही त्याच्या रांगेत उभे राहिलो. आधीचा खेळ संपला आणि आम्हाला आत सोडायला सुरूवात केली. आतमध्ये बर्यापैकी गर्दी होती. आपले नाट्यगृह असते तसा हा एक मोठा हॉल होता. उतरता प्रेक्षागृह आणि समोर स्टेजच्या जागी एक मोठा टँक होता. टँकची प्रेक्षकांकडची बाजू काचेची होती. त्यामुळे पाण्याच्या आतले पण दिसणार होते. त्यामानाने आम्ही लवकर आल्यामुळे बसायला चांगली जागा मिळाली. पुढच्या चार रांगात बसायचे असेल तर भिजायची तयारी ठेवा असे सांगण्यात आले. त्यामुळे काहीजण उठून मागे गेले आणि आम्ही एकदम समोरची आणि चौथ्या रांगेतील जागा पटकावली. इथला स्टाफ पण एकदम उत्साही होता. शो सुरू होईपर्यंत त्यांनी निरनिराळे क्विझ घेऊन लोकांचे मनोरंजन केले. हॉल भरला, आणि शोची पण वेळ झाली.
 |
| डॉल्फिन शोच्या आधीची डॉक्युमेंटरी पाहताना |
लाईट्स घालवले गेले आणि ह्या अॅक्वेरियमबद्दल एक आॅडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटरी दाखवली गेली. आणि त्यानंतर रंगीबेरंगी फवार्यांमध्ये डॉल्फिन शो सुरू झाला. डॉल्फिन्सच्या वेगवेगळ्या कसरती, त्यांच्या उंच उड्या मारणे, ट्रेनर्सच्या नकला करणे, ट्रेनर्सला पाठीवर घेऊन पोहणे, आणि अनेक. हा मासा किती माणसाळू शकतो हे बघून खरोखर थक्क व्हायला होते. त्यांचे प्रेक्षकांवर पाणी उडवणे, ट्रेनर्ससारखे कठड्यावर मान टेकवून उभे राहणे, सगळ्यांना बाय बाय करणे, केवळ अविश्वसनीय. त्यांच्या ट्रेनर्सचे पण कौतुक करावेसे वाटते की किती प्रेमाने ते ह्यांच्याशी वागत होते. पापा घेणे, मिठ्या मारणे, गोंजारणे, चांगला खेळ केला म्हणून कौतुक करणे, अगदी लहान बाळांना वागवतात तसे, अतिशय विलोभनीय. हा खेळ संपूच नये असे वाटत होते. एक महत्त्वाचे म्हणजे इथे डॉल्फिन्सचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून फोटो काढायला अजिबात परवानगी नव्हती, अगदी फी भरुन देखील. आणि सगळेजण त्याचे काटेकोर पालन करत होते. त्यामुळे कल्पना यावी म्हणून मी गुगलवरून घेऊन काही फोटो इथे पोस्ट केलेत. हा अतिशय मनोरंजक शो बघून बाहेर पडलो. बाहेर मोठमोठ्या ग्लास विंडोजमध्ये हे डॉल्फिन्स शांतपणे पोहताना दिसत होते. इतरही काही छोटेमोठे मासे इथे डिस्प्ले केले होते.
 |
मनोरंजन करताना डॉल्फिन्स.
कोर्टेसी गुगल |
 |
मनोरंजन करताना डॉल्फिन्स
कोर्टेसी गुगल |
डॉल्फिन शो पाहताना भान हरपून आम्ही ते खेळ बघत होतो, पण आता बाहेर आल्यावर मात्र सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली होती. पुढचा शो सी-लायन्सचा होता. तिथे जायच्या आधी आम्ही कँटीनकडे वळलो. एव्हाना कँटीनमध्ये पण खूप गर्दी झाली होती. जवळपास कुठेही टेबल-खुर्ची रिकामी नव्हती. फूड काउंटरवर पण खचाखच गर्दी असल्याने मुलांना पण जेवण घेऊन यायला बराच वेळ लागला. तिथे बसायला जागा नसल्याने आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. तिथे मोठा डायनिंग हॉल होता. आजुबाजुला मोठमोठ्या शोकेसमध्ये विविध प्रकारचे मासे पोहत होते. समोर टेबलवरचे प्रसन्न दीपालीने आणलेले चविष्ट फिश फिंगर्स आणि चिकन लॉलीपॉप खातखात आम्ही वातावरण एंजॉय करत होतो. जेवण झाल्यावर लगेचच सी-लायन्स शो बघायला निघालो. डॉल्फिन शो प्रमाणे इथे पण एका हॉलमध्ये बसायची व्यवस्था केली होती. हा हॉल त्यामानाने खूप लहान होता. समोर स्टेजवर छोट्या सी-लायन्सपासून ते गलेलठ्ठ सी-लायन्सपर्यंत सगळ्यांचे खेळ दाखवले गेले. ते ट्रेनर्सनी दिलेल्या सूचनांचे अगदी तंतोतंत पालन करत होते. लठ्ठ सी-लायन्स मासे डुलत डुलत नाचताना बघून खूप मजा येत होती. डॉल्फिन शोच्या मानाने हा शो बराच लवकर संपला. इथेपण फोटो काढण्यास मनाई होती.
 |
| मोठ्या शोकेससमोर |
 |
| व्हेल शार्क्स |
पुढे ओशन व्हॉयेजर नावाचा एक विभाग आहे. तिथे वर्तुळाकार गुहेसारख्या काचेच्या मार्गातून जाताना अगदी समुद्रातून गेल्यासारखे वाटते. आजुबाजुला सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे मासे, मुख्यत: व्हेल शार्क्स पोहताना दिसतात. खुप सुंदर वातावरण आहे इथे, फार भारी वाटते. इथून पुढे एका मोठ्या विंडोत असंख्य छोटे छोटे रंगीबेरंगी सुंदर मासे होते. इथे आलेला प्रत्येकजण ह्या शोकेसमोर फोटो काढून घेतल्याशिवाय पुढे जाणेच अशक्य. अजून थोडे पुढे गेल्यावर छोट्या छोट्या शोकेसेसमध्ये जेली फिश, सी हॉर्स सारखे छोटे सुंदर मासे ठेवलेत. पुढे सगळ्यात शेवटी एक खूप मोठी शोकेस आहे. त्यात वरून जे लाईट सोडलेत, ते अगदी आत सूर्यकिरण डोकावत असल्यासारखा फील देतात. हा ओशन व्हॉयेजर विभाग खरोखरच अप्रतीम आहे.
 |
| ओशन व्हॉयेजर मध्ये |
 |
| जेली फिश |
 |
| सुंदर रंगीबेरंगी मासे |
 |
| ओशन व्हॉयेजरमधून बाहेर पडताना शेवटची शोकेस |
वरच्या मजल्यावर अजून एक फोर डी शो होता. तिथे गेलो तर पुढचा शो चार वाजता सुरू होणार होता. एवढा वेळ थांबण्यापेक्षा जमलं तर कोकाकोला फॅक्टरी बघावी म्हणून ह्या सुंदर अॅक्वेरियम मधून बाहेर पडलो. बाहेर पडल्या पडल्या समोरच ही फॅक्टरी आहे. तिथे जवळ गेलो तर तिकिटासाठी खूप मोठी रांग होती. म्हणजे तिकिटे मिळायलाच अर्धाएक तास तरी गेला असता. आणि नंतर परत आतमध्ये फिरावे लागणार होते. सकाळपासून आत्तापर्यंत फिरून फिरून स्टॅमिना संपत आला होता. प्रसन्न इथे आधी येउन गेला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे इथली खास गोष्ट म्हणजे जगभरातील विविध देशांतील कोकाकोलाचे फ्लेवर्स इथे चाखायला मिळतात. फक्त एवढ्यासाठी दोन तास घालवण्यापेक्षा आम्ही मागच्या बाजूला असलेल्या त्यांच्या स्टोअरमध्ये गेलो. तिथून फॅक्टरीची आतली बाजू पण दिसत होती. स्टोअरमध्ये काही मोमेंटोज खरेदी केले. विशेष म्हणजे इथे हिंदीत प्रिंट केलेले टीशर्ट पण होते. इथेच कोकाकोलाची बाटली पण घेतली. ओरिजिनल टेस्ट काय असते हे समजल्यावर आपण भारतात किती पानचट कोकाकोला पितो हे लक्षात आले.
 |
| कोकाकोला फॅक्टरीसमोर |
 |
| हिंदी प्रिंटींग |
इथून बाहेर पडल्यावर घड्याळ पाहीले. चार वाजून गेले होते. दीपालीला आज झोपायच्या आधी काही सबमिशन्स करायची होती. आमचे वास्तव्य अजून खूप दिवस होते. आज दिवसाउजेडी अॅटलांटा पाहीले होते. प्रसन्नच्या म्हणण्याप्रमाणे इथला रात्रीचा झगमगाट पण पाहण्यासारखा असतो. तेंव्हा आजची अॅटलांटा व्हिजीट इथेच संपवून पुढच्या वेळेस संध्याकाळी अॉलिंपिक स्टेडियमवर येऊ आणि नंतर रात्रीचे अॅटलांटा बघू असे ठरवून मिल्टनमुक्कामी परत निघालो.
No comments:
Post a Comment