Sunday, February 12, 2017

१२ - भारतीय समुदायाचे आदरातिथ्य आणि बाय बाय अमेरीका

प्रसन्न पहिल्यांदा सायप्रसला गेला तेव्हा आम्हाला त्याची खूप काळजी वाटायची. एवढ्या लांब ओळखीचे कोणी नाही. ग्रीक आणि टर्की लोकांच्यात हा कसा राहील, वगैरे वगैरे. पण जेव्हा त्याने सांगितले की त्याचे रुम पार्टनर पंजाबी आहेत तेव्हा थोडा रिलीफ वाटला, थोडा. नंतर लग्न करून तो दीपालीला घेऊन गेला. हळूहळू तो तिथे सेटल होतोय तोच त्याला अमेरिकेची अॉफर आली. ह्यावेळी तर तो ह्या नव्या ठिकाणी बायकोची जबाबदारी घेऊन चालला होता. मुलं बिनधास्त असतात, पण आईबापाला तर काळजी असतेच ना. परत अमेरिकेबद्दल कानावर काहीबाही पडत असते. पण मी आणि सुजाता इथे अमेरिकेत आलो, आणि जे काही प्रत्यक्ष अनुभवलं, त्यानंतर मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आम्ही एकदम निर्धास्त झालो. प्रसन्न राहतो तो अल्फारेट्टा भाग तसा नवीन, ह्या १०-१२ वर्षात डेव्हलप झालेला. त्यामुळे बहुतेक सगळा वर्ग सुशिक्षित. इथे भारतीय मंडळी पण भरपूर दिसतात. इथले ८ ते १० टक्के पॉप्युलेशन हे भारतीय आहे. इथे भारतीय हॉटेल्स, भारतीय मंदिरे, भारतीय मॉल आणि दुकाने बरीच दिसतात. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रसन्न रहात असलेले मिल्टन शहर हे जॉर्जिया स्टेटमध्ये दोन नंबरवर आहे.




माझ्या अमेरिका ट्रिपमधला आजचा लेख, प्रसन्न दीपालीच्या ज्या भारतीय मित्रमैत्रिणींना आम्ही भेटलो, त्यांच्यावर असून ह्या लेखमालेचा हा शेवटचा लेख आहे. 

इथे आल्यावर पहिल्याच आठवड्यात प्रसन्नच्या एका सहकाऱ्याच्या मुलीचा, माहीराचा, पहिला वाढदिवस होता. सहकारी म्हणण्यापेक्षा त्याच्या बॉसच्या मुलीचा कार्यक्रम होता. इथली एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती म्हणजे इथे सिनियर-ज्युनियर असे आपल्यासारखे अंतर ठेवत नाहीत. एकमेकांशी एकेरीत बोलतात, अगदी मित्रासारखे. आम्ही आलोय म्हटल्यावर त्याने प्रसन्नला फोन करून आम्हाला पण घेऊन यायला सांगितले. अमेरिकेतला आम्ही अॅटेंड केलेला हा इथला पहिला भारतीय कौटुंबिक कार्यक्रम. आम्हाला पण इथली भारतीय मंडळी असले कार्यक्रम कसे साजरे करतात हे बघायची उत्कंठा होतीच. त्याने एका भारतीय हॉटेलमध्ये हॉल बुक केला होता. आम्ही तिथे गेलो, आणि प्रसन्नचा मित्र वेलकम करायला आला आणि चक्क आमच्या पाया पडला. धर्माने मुसलमान, पण संस्कार भारतीय. हळू हळू एकेक जण यायला लागले आणि प्रसन्न आमची त्यांच्याशी ओळख करून देत होता. इथेच आमची कोल्हापूरच्या खोपडे दांपत्याशी पहिली ओळख झाली. व्हेज-नॉनव्हेज जेवण होते. तिथेच चवीने चिकन तंगडी खाणार्‍या एका रोहित नावाच्या मुलाशी प्रसन्नने ओळख करून दिली. एकदम हसतमुख, काका काळजी करू नका आपण पूजा मस्त करू असे म्हणून आमच्याकडच्या सत्यनारायण पूजेचे पौरोहित्य तोच करणार आहे हे सांगितले. जीन्स टीशर्ट मधला आय.टी. इंजिनियर मुलगा अमेरिकेत पूजा सांगणार हे बघून त्याचे खरेच कौतुक वाटले.

ह्या पार्टीत ओळख झालेल्या गिरीश-रुपाली कुलकर्णी ह्यांनी एक दिवस आम्हाला बार्बेक्यूसाठी त्यांच्या घरी बोलवले. रूपालीचे आई-बाबा पण आमच्यासारखे दोन-तीन महिन्यांसाठी आले होते. ह्या निमित्ताने त्यांची आणि आमची चांगली ओळख झाली. घराच्या समोर छान फुलझाडे होती. बॅकयार्डमध्ये पोर्टेबल इलेक्ट्रिक तंदूर ठेवला होता. तिथेच बाजूला खुर्च्या घेऊन आम्ही गप्पा मारत बसलो. पाठीमागे पूर्ण झाडी होती, जणूकाही आम्ही एका जंगल रिसॉर्टमध्ये बसलो होतो. थोड्या वेळाने गिरीश आणि रुपालीने आधीच मॅरीनेट करून ठेवलेले चिकन लेग्ज आणले आणि ह्या तंदूरवर भाजून आम्हाला दिले. प्रसन्नने पण फोटो पोज देण्यापुरती त्यांना मदत केली. थोडा अंधार व्हायला सुरुवात झाली आणि आजूबाजूला मस्त काजवे उडताना दिसायला लागले. त्यांच्या इथे कधीतरी हरणे पण दिसतात म्हणे. कशी मस्त राहतात ही मंडळी. आम्हाला वाटले होते की तंदूर पार्टी म्हणजे तंदूर चिकन खाऊन आम्ही परत घरी येऊ. पण रुपालीने बिर्याणीपण तयार ठेवली होती. पोटभर जेवण झाले आणि त्यांच्या छोट्या अथर्वने आईस्क्रीमची डिमांड टाकली. साहजिकच आईस्क्रीमला नाही म्हणणे शक्य नव्हते. १० वाजता त्यांचे आवडते आईस्क्रीम पार्लर बंद होणार होते, त्यामुळे आम्ही लगेचच बाहेर पडलो. त्या दुकानातले शेवटचे कस्टमर आम्हीच होतो. गिरीशची नवीन इलेक्ट्रॉनिक कार पण पाहिली, फारच छान होती. अमेरिकेत राहणार्‍या आपल्या मुली किती सुगरण असतात ह्याची झलक आम्हाला आज पहायला मिळाली.

कुलकर्णी कुटुंबीयांबरोबर बार्बेक्यू पार्टी

अमेरिकेत आल्यावर प्रसन्न-दीपालीने सुरुवातीला भाड्याने घर घेतले होते. पण इकडे घरकर्जाचे व्याजदर खूप कमी आहेत, आणि कर्ज परतफेडीची मुदत पण ३० वर्षे आहे. हिशोब केला तर घराचे भाडे आणि कर्जाचा हप्ता जवळपास सारखेच होतात. म्हणून त्यांनी स्वतःचेच नवीन घर घेतले. आम्ही आल्यावर खरेतर त्यांना वास्तूशांत करायची होती, पण मुहूर्त नसल्यामुळे निदान सत्यनारायण पूजा तरी करू असे ठरवले. नायगारा-न्यूयॉर्क ट्रिपवरून आल्यावर एका शनिवारी पूजेचा कार्यक्रम ठरला. त्यानिमित्ताने नवीन घर दाखवायला मुलांनी त्यांच्या आॅफिसमधल्या सहकाऱ्यांना आमंत्रण दिले. पूजेच्या दोन-तीन दिवस आधी रोहित-चित्रा येउन पूजेची कायकाय तयारी करायची हे ठरवून गेले. हे जोडपे अतिशय उत्साही आहे. आमच्यापासून त्यांचे घर बरेच लांब आहे. तरीही रात्री ९ वाजता एकदम फ्रेश मूडमध्ये गप्पा मारत होते. काही मदत हवी आहे का हे आवर्जून विचारले. पूजेला चौरंगाची सोय पण त्यांनीच केली. पूजेसाठी सामान कुठे मिळेल ते पण सांगितले. अल्फारेट्टामध्ये एक हनुमान मंदिर आहे. एका शनिवारी आम्ही तिथे गेलो होतो. इथे मारूतीची खूप छान आणि मोठी मूर्ती आहे. आम्ही गेलो तेव्हा दही, दूध, मध अशा पंचामृतांचा अभिषेक चालू होता. बाजूला इतर काही देवता पण होत्या. बहुतेक मंडळी दक्षिण भारतीय दिसत होती. खूप प्रसन्न वातावरण होते. मंदिराच्या बाहेरच एक साऊथ इंडियन हॉटेल होते. तिथेच बुफे जेवण करुन आम्ही बाहेर पडलो. शेजारी फुलांचे दुकान दिसले. ह्या दुकानात आम्हाला सत्यनारायण पूजेसाठी लागणारी फुले तर मिळालीच, शिवाय कृष्णाचा फोटो, सुपार्‍या वगैरे पूजेचे सगळे सामान पण मिळाले.

प्रसन्न दिपालीची सगळ्यांना आमंत्रणे गेली होती. त्यांच्या इथल्या पद्धतीप्रमाणे ९९ टक्के लोकांचे आर.एस.व्ही.पी. येतोय म्हणून आले होते. जेवणाची आॅर्डरसुद्धा एका भारतीय रेस्टॉरंटला दिली होती. गॅरेज धुवून साफसूफ करून झाले होते. प्रसन्न दीपाली फुले आणि इतर सामान आणायला बाहेर पडले. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे टेबलखुर्च्या घेऊन टेम्पो हजर झाला. टेम्पोवाल्याबरोबर बोलताना कळले की तो प्रसन्नच्याच कंपनीत काम करतो. मुळचा हैदराबादचा हा माणूस इथे येऊन सेटल झाला होता. सामान उतरवून होतंय तेवढ्यात मुलं पण आली. मग थोडी आवराआवर करून जेवण झाल्यावर मी आणि सुजाता झोपायला गेलो. सकाळी उठून बघतो तर मुलांनी घराचा कायापालट करून ठेवला होता. दीपाली तर कलाकार मुलगी आहे. घर कसे सजवावे हे ती खूप छान समजते. सगळी तयारी करूनच ते दोघे झोपले होते असे दिसले. बरोबर आठ वाजता रोहित गुरुजी सपत्निक हजर झाले. रोहित पूजेचे एक पुस्तक घेऊन आला होता. एवढ्या वेळा पूजा केल्यामुळे आम्हाला पण पूजेची मांडणी माहीत होती. बरोबर ९ वाजता पूजेला सुरूवात झाली आणि ११ वाजेपर्यंत संपली पण. पूजेदरम्यान काय हवे नको ह्यावर चित्रा लक्ष ठेवून होती. अगदी उदबत्ती लावली तेव्हा सिक्युरिटी सेन्सरपर्यंत धूर पोचणार नाही ह्याची पण तिने काळजी घेतली. पूजा सांगताना काहीवेळा आमचा इंजिनियर गुरूजी सराईतपणे संस्कृत स्तोत्रांचा मराठीत अर्थ पण सांगत होता. काही अडले तर आम्हाला पण विचारत होता. अशा प्रकारे अतिशय भावपूर्ण प्रकारे, आणि हसतखेळत इथे अमेरीकेत आम्ही सत्यनारायणाची पूजा केली. साडेअकरा बारानंतर एकएक करत सगळे पाहुणे जमा झाले. रोहितच्याच गाडीतून प्रसन्न आणि रोहित जेवण घेऊन आले. काहीजणांचे आईबाबापण आले होते. प्रसन्न दीपालीचे पाहुणे त्यांना लागेल तिथे मदत पण करत होते. लहान मुलांसाठी दीपालीने सोप-बबलची खेळणी आणली होती, त्यामुळे त्यांचे आईबाबापण मोकळेपणाने एन्जॉय करू शकत होते. पूजेला आलेल्या प्रसन्नच्या काही मित्रांचे रोझे चालू होते म्हणून ते जेवले नाहीत, पण संध्याकाळी खातो म्हणून आवर्जून प्रसाद आणि जेवण बांधून घेऊन गेले. ह्या पूजेच्या निमित्ताने मला आणि सुजाताला मुले इथे कशी आनंदात एकमेकांना धरून राहतात हे पहायला मिळाले.

पूजा चालू असताना

पाहुणे मंडळी

पाहुणे मंडळी

श्री सत्यनारायण पूजा

सत्यनारायणाची पूजा केली तेंव्हा मुलांनी त्यांच्या आॅफिसमधले आणि जुन्या कम्युनिटीमधल्याच मित्र-मंडळींना बोलावले होते. आत्ताचे शेजारी राहणाऱ्या मंडळींना कधी बोलवायचे हे ते ठरवत होते. तेवढ्यात त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये (हिडन फॉरेस्ट देसी ग्रुप) पॉटलक पार्टीची तारीख ठरली. आम्ही न्यूयॉर्क-नायगारा ट्रिपला गेल्यामुळे मागच्या पार्टीला हे दोघे जाऊ शकले नव्हते. त्यामुळे दीपालीने, आईबाबा आले आहेत, त्यांची पण सगळ्यांशी ओळख होईल, म्हणून ही पार्टी आमच्याकडे घेऊ असे सुचवले. ह्या पॉटलक पार्टीबद्दल ऐकले होते, पण ह्यावेळेस अनुभवले. सगळेजण आधीच ठरवल्याप्रमाणे एक एक पदार्थ घेऊन आले. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या मुलींच्या वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. मी आधी लिहिल्याप्रमाणे इथल्या भारतीय मुली खरंच सुगरणी असतात ह्यावर आज शिक्कामोर्तब झाले. दीपाली पुणे सोडून गेली, त्यानंतर फोनवर/स्काईपवर सुजाताला आणि आईला विचारून, युट्यूबवर बघून खुप पदार्थ शिकली. आता ती इतकी तयार झाली आहे की सुजाता पण तिच्याकडून काही परदेशी पदार्थ शिकायला लागलीये. आणि इथल्या ह्या देसी मुलींनी तर कमालीचे अप्रतिम पदार्थ केले होते. कोल्हापूरच्या स्नेहाची बिर्याणी आणि तेलुगू सिरीशाची कुल्फी तर लाजवाब. ह्या मुलांशी गप्पा मारताना एक घरेलुपणा जाणवला. एकमेकांना मदत करायची इच्छा दिसली. अतिशय मनमोकळे वातावरण होते. खरे तर आज मी खर्‍या अर्थाने मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्धास्त झालो.

पुढच्याच आठवड्यात शेजारचे तीन बंगले सोडून पुढच्या बंगल्यात राहणार्‍या निशांत-कानूच्या मुलीचा, मिशीकाचा दुसरा वाढदिवस होता. पॉटलक पार्टीच्या वेळेसच त्याने प्रसन्न दीपाली बरोबर आम्हा दोघांना पण आमंत्रण दिले होते. पॉटलक पार्टीच्या दिवशी होते तेच सगळे ह्या वाढदिवसाला आले होते. हा कार्यक्रम पण खूप छान झाला. पॉटलक पार्टीच्या वेळेस आम्ही दोघे घरी असल्याने ड्रिंक्स नव्हती. पण ह्या वाढदिवसाला सर्व साग्रसंगीत तयारी होती. आम्ही थोडे उशीराच गेलो. तोवर त्यांचा हा कार्यक्रम संपत आला होता. तरीसुद्धा का कोण जाणे, आमच्या उपस्थितीमुळे जे ड्रिंक्स घेत होते ते थोडे संकोचल्यासारखे वाटले. त्यामुळे काहीतरी कारणे काढून पुढच्या एक दोन मोठ्या ग्रुप पार्ट्यांना जाणे आम्ही टाळले.

मिशिकाचा वाढदिवशी देसी गर्ल्स बरोबर सुजाता

मिशिकाचा वाढदिवशी देसी बॉईजबरोबर

आईच्या कडेवर बर्थडे गर्ल

इथल्या मुलांची, भारतातून आलेल्या पेरेंट्सना घरी बोलवायची प्रथा आहे की काय कोणास ठाऊक, पण बर्‍याच जणांनी आम्हाला चहापानासाठी बोलावले. संदीप आणि नेत्रा पत्की ह्यांच्याकडे एका सकाळी ब्रेकफास्टला गेलो होतो. ही पण पुण्याचीच जोडी. त्यांच्या छोट्या सोहमबरोबर गप्पा मारत गरम गरम इडली सांभार झाले. सुरुवातीला त्यांच्याच कम्युनिटी मध्ये प्रसन्न दीपाली रहात होते. त्यामुळे प्रसन्नने तिथले टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, कॉमन वॉशिंग मशीन रूम ह्या सगळ्या सोयी आम्हाला दाखवल्या. आख्खी कम्युनिटी रेंटल अपार्टमेंट्सची. इथे बरेच इंडियन राहतात म्हणे. प्रसन्न दीपालीला सेटल व्हायला इथल्या मित्रांची खूप मदत झाली होती. दीपालीला जॉबपण इथल्याच एका काकांच्या ओळखीमुळे मिळाला.

गौरव आणि स्नेहा हे असेच एक उत्साही कोल्हापूरी जोडपे. अमेरिकेत एकत्र एम.एस. केल्यानंतर विवाहबद्ध होऊन इथेच स्थायिक झालेले. ह्यांच्या देसी ग्रुपमधले हेच सिव्हिल इंजिनीअरिंग लाईनमधले, बाकी सगळे आयटीवाले. काका, कंटाळा आला की कधिही घरी या, स्नेहा घरीच असते म्हणून आम्हाला स्टँडींग इन्व्हिटेशन देऊन ठेवले होते. आमचा जायचा दिवस जवळ आला तेव्हा एका संध्याकाळी चहाला म्हणून त्यांच्याकडे गेलो. इथली सगळी घरे साधारण एकाच साच्यातली, पण तरीही प्रत्येकाने आपल्या परीने वेगळेपण ठेवले होते. ह्यांच्या घराचा मागचा डेक हे त्यांचे वैशिष्ट्य. बॅकयार्डचे लॉनसुद्धा मस्त मेन्टेन केले होते. निघताना पाया पडून सहा महिन्यांनी परत या म्हणायला पण विसरले नाहीत. अरे सारखे सारखे काय पाया पडता म्हणालो तर, काका इथे आम्हाला आशिर्वाद देणारे असे क्वचितच मिळतात हे उत्तर. ते पण चूक नव्हते म्हणा.

अमेरिकेतले वास्तव्य आता संपत आले होते. तरी प्रसन्नच्या मित्रांची आमंत्रणे येतच होती. पाठीमागच्याच बंगल्यात राहणार्‍या विद्युत आणि मनीदीपा ह्यांच्याकडे मस्त नॉनव्हेज जेवण होते. ही मुलगी खुपच छान शेफ होती हे आवर्जून जाणवले. ह्यांचे घर म्हणजे संपूर्ण कम्युनिटीमधले एकुलते एक तीन मजली घर होते जिथे लिफ्ट होती. बिल्डरने स्वतःच्या आईसाठी बांधलेले हे घर विद्युतने विकत घेतले होते. इंटेरियर अतिशय सुंदर होते. त्या जोडीला विद्युतने स्वतः काढलेली पेंटींग्ज पण लावली होती. एरवी बोलताना कधी त्याच्या ह्या कलेचा उल्लेख आला नव्हता.

असेच एकदा आम्ही दीपालीची मैत्रीण संध्याकडे जेवायला गेलो. आमच्याकडे पूजेला पण हे सगळे येऊन गेले होते. संध्याकाळी फिरायला जाताना तिचे वडील कधीतरी दिसायचे, आम्ही एकमेकांकडे बघून स्मितसुद्धा करायचो. पण पूजेला एवढे जण होते कि त्या धामधुमीत हे तिचेच वडील म्हणून माझ्या लक्षात राहिले नव्हते. एकदा मी सहज रस्त्यात थांबून त्यांना विचारले की ते भारतीय आहेत का. त्यांच्या लक्षात आले की मी त्यांना ओळखले नाही. जेंव्हा त्यांनी सांगितले की ते आमच्याकडे येऊन गेलेत, आणि त्यांची मुलगी संध्या इथे जवळच राहते, तेंव्हा मी एकदम खजील झालो. सॉरी म्हणून मी ती वेळ भागवून नेली. आता आपले वय झाले ह्याची ही निशाणी होती बहुधा. दीपाली जेंव्हा बोलली की आपल्याला संध्याकडे जायचेय, तेंव्हा बरे वाटले की आता तिच्या वडिलांशी नीट बोलता येईल. पण आम्ही त्यांच्याकडे गेलो तेंव्हा कळले की ते गेल्याच आठवड्यात भारतात परत गेले. एनीवे, दीपालीने सांगितल्याप्रमाणे ह्या संध्याची बिर्याणी खरोखर अप्रतीम होती. प्रॉपर हैदराबादी बिर्याणी. आमच्या शेख भाभींच्या बिर्याणीची आठवण आली. तीचा नवरा किशोर पण खूपच हुशार होता. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारताना तो इतके संदर्भ द्यायचा ना, तिथेच त्याचा अभ्यास जाणवायचा. प्रसन्न दीपाली सायप्रसहून इथे आले तेंव्हा हॉटेलमध्ये राहत असताना त्यांची ओळख झालेली. अमेरिकेच्या अनेक व्हिसाज आणि इथल्या डिपेन्डन्टसाठीच्या नोकऱ्या ह्याबाबतीत त्याने ह्या दोघांना मार्गदर्शन केले होते. त्यांचा छोट्या मुलाची, हॅपीची पण मधूनमधून लुडबुड चालू होती. मुलांच्या इथल्या शिक्षण आणि शाळांबद्दल ह्या संध्याने चांगली माहीती दिली. छान वेळ गेला आमचा.

एका रात्री रोहित आणि चित्रा ह्यांच्याकडे पण आम्ही जेवायला गेलो. आधी सांगितले तसे रोहित हा पुण्याचा बामन हरी, शुद्ध मांसाहारी. पण त्याची पत्नी चित्रा माहेरची जैन, अजूनही शाकाहारीत्व टिकवून ठेवलेली. अतिशय उत्साही जोडपे. घर छान डेकोरेट केलेले. तिची स्वतःची पेंटींग्ज भिंतीवर लावलेली. घरातले काही फर्निचरसुद्धा स्वतः बनवलेले. बॅकयार्डमध्ये त्यांनी भाज्या लावल्या होत्या. ससे ह्या भाज्या टिकून देत नाहीत तरीही त्यांची छोटी घरगुती शेती छान हिरवीगार होती. त्यांचाच अजून एक मित्र प्रशांत पण आला होता. त्याची पत्नी मुलाला घेऊन पुण्याला माहेरी गेली होती म्हणून तो एकटाच आला होता. मला आठवतंय त्याप्रमाणे जाताना ती आम्हाला भेटून पण गेली होती.

प्रसन्न आणि दीपाली, चित्रा आणि रोहीत केंदूरकर ह्यांचेबरोबर
(हा फोटो पूजेच्या दिवशी प्रसन्नच्या घरी काढलेला आहे)
किती हा जिव्हाळा. आपण इकडे पुण्यात बघत असतो की सगळे एकमेकांच्या तंगड्या खेचत असतात. पण तिकडे सगळे एकमेकांना आधार देत राहतात. मी कोणालाही दुसर्‍याच्या पाठीमागे टीका करताना ऐकले नाही. थट्टामस्करीत विनोद केले असतील, पण टीका नाही. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रत्यक्ष पाहिल्या आणि प्रसन्न दीपालीची काळजी करणे बंद केले. परत मी तिकडे जातोय की नाही, ही सगळी मंडळी परत भेटतील की नाही हे काही सांगू शकत नाही. पण मला हे वातावरण खरंच खूप आवडलं. अगदी शेवटच्या दिवशी आम्ही चौघेजण जेवायला बाहेर निघालो होतो. प्रसन्नचे मित्र रस्त्यात दिसले म्हणून निरोप घेण्यासाठी मी गाडीतून खाली उतरलो. तिथे रस्त्यात एकजण पाया पडला. ही म्हणजे कमालच होती.

इंचीन बांबू गार्डन मध्ये शेवटच्या दिवशी

आणि निघायचा दिवस आला. दोन दिवस आधीपासूनच बॅगा भरणे चालू होते. मुलांना सवय असल्याने बहुतेक हे काम त्यांनीच केले. बॅगा भरल्यावर त्यांची वजने बघून परत ह्या बॅगेतले कमी करून त्या बॅगेत भर हे सगळे सोपस्कार पार पडले. संध्याकाळी साडेचारची फ्लाईट होती. दीड वाजेपर्यंत पोचायचे होते. मुलांची आॅफिसची कामे पण खूप होती हे त्यांच्या रोजच्या धावपळीवरून दिसत होते. ब्रेकफास्ट-कम-जेवण करून ते दोघे आॅफिसला गेले आणि बरोबर साडेअकराच्या ठोक्यास घरी आले. आम्ही दोघे जेवण करून कपडे करून तयार होतो. मुलं आल्याबरोबर पटापट बॅगा डिकीत टाकल्या आणि स्वगृहपरतीसाठी अॅटलांटा एअरपोर्टला निघालो. आज दिवसाउजेडी अॅटलांटा एअरपोर्ट बघत होतो. डेल्टा एअरलाईन्सचे हे मुख्य हब आहे. एकापाठोपाठ विमाने येतजात होती. अमेरिकेतील सर्वात जास्त वर्दळ असलेला हा विमानतळ. सिक्युरिटीची अनाउन्समेंट झाली. सुजाता दीपालीची गळाभेट झाली. प्रसन्नच्या डोळ्यात ताटातूटीचे दुःख जाणवत होते, पण तो ते दाखवत नव्हता. सिक्युरिटी चेक होईपर्यंत ते दोघे बाहेर उभे होते. सर्व चेकिंग सुरळीत झाल्यावर आम्ही एकमेकांना हात हलवून निरोप घेतला. आतमध्ये फ्लाईटच्या गेटजवळच एका बाकड्यावर विसावलो. जवळच कॉफीशॉप होते तिथून कॉफी घेतली. वायफाय आॅन केले आणि प्रसन्नला व्हॉट्सअॅप कॉल लावला. रिंग वाजली आणि बंद झाली. लगेच दीपालीचा उलटा फोन आला. कॉफी बिस्किटे काहीतरी घ्या, जमलं तर फ्रँकफर्टला पोचल्यावर फोन करा, हे करा, ते करा, काळजी घ्या. म्हणजे जे आम्ही म्हणायला हवे होते ते तीच बोलत होती. मुलं आता जबाबदार झाली होती.

अॅटलांटा एअरपोर्टवर निरोप सेल्फी

आमची ही अमेरिका ट्रिप खूपच छान झाली. नविन प्रदेश, नव्या संस्कृती, विविध खाद्यप्रकार, शिस्त, स्वच्छता, सर्व मोहीत करणारे होते. आपल्याकडे पण खूप काही आहे, त्यांच्यापेक्षाही जास्त आहे. पण नाही ती फक्त शिस्त, स्वच्छता आणि राजकीय जिद्द. वंदे मातरम्. 

No comments:

Post a Comment