Sunday, February 12, 2017

९ - ऑलिम्पिक स्टेडियम आणि अन्य, अॅटलांटा

आम्ही इथे आहोत तोवर सुजाताच्या हातचे बटाटेवडे खायची मुलांची फर्माईश होती. म्हणून एक दिवस सुजाता आणि दीपालीने उद्या सकाळसाठी म्हणून पाववड्याची तयारी करून ठेवली, आणि आम्ही झोपायला गेलो. सकाळी उठल्या उठल्या मुलांनी डिक्लेअर केले की आज आपण अॅटलांटाला आयकीया मॉलला जात आहोत. आमचा लगेच प्रश्न, अरे पण त्या बटाटेवड्यांच्या तयारीचे काय? त्यात काय, वडे तयार करून बरोबर घेऊन जाऊ आणि तिथेच खाऊ, मुलांचे उत्तर तयार. मग काय, आवरले आणि निघालो. आम्ही दोघे तर इथे भटकायलाच आलो होतो, आणि हे दोघेही त्यांच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार आम्हाला कुठे ना कुठे नेत होते.

अॅटलांटातील ह्या आयकीया मॉलमध्ये घरात लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर उपलब्ध आहे. एक संपूर्ण मजला फर्निचर डिस्प्लेसाठी वापरला आहे. इथे हॉल, बेडरूम, स्टडी रूम, डायनिंग रुम, चिल्ड्रेन्स रुम, टॉयलेट्स अशा विविध खोल्यांची रचना करून त्यांत लागणार्‍या सर्व वस्तू योग्य त्या जागांवर ठेवल्या आहेत. लहान जागेत खूप सामान ठेवले तरी खोली मोकळी कशी दिसेल अशा विविध रचना इथे दिसतात. एक बेडरूमचा फ्लॅट असो,  किंवा छोटा स्टुडिओ अपार्टमेंट, ह्यात कुठे काय ठेवले की थोड्या जागेवर जास्तीत जास्त  सामान मांडता येईल हे पण लक्षात येते. आपल्याला आवडेल त्या त्या वस्तूंचे कोड नोट करून त्यांची आॅर्डर दिली की त्या सगळ्या वस्तू खालच्या मजल्यावरच्या स्टोअरमधून उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मोठमोठे फर्निचरसुद्धा फोल्ड करून पॅक करून मिळत होते. कारच्या डिकीमध्ये टाकून लोकं हे फर्निचर घरी घेऊन जातात आणि घरी गेल्यावर ते अॅसेंबल करून वापरतात. असेंब्लीसाठी लागणारे सर्व नटबोल्ट, स्क्रूज वगैरे ह्या पॅकमध्येच असते. प्रसन्न आम्हाला सगळे समजावून सांगत होता. आपल्याकडचे हे टेबल, हा रॅक इथलाच वगैरे दाखवत पुढे नेत होता. हे सगळे बघून झाल्यावर खालच्या मजल्यावर जाण्यासाठी निघालो.

आयकीयातील मॉडेल किचन

खाली जायचा रस्ता कँटीन मधून जात होता. तिथला तो खमंग वास नाकात गेल्यावर भूक लागणे साहजिकच होते. प्रसन्नने ह्याआधी इथे खूप खरेदी केली असल्यामुळे तो आयकीयाचा एलाईट मेंबर आहे. त्यामुळे त्याला कँटीनमध्ये कॉफी फ्री होती. अन्यथा सुद्धा काही ठराविक रकमेची खरेदी करणार्‍यांना पण कॉफी फ्री असते. मी आणि सुजाता एका कोपर्‍यात एक टेबल पकडून बसलो. तोवर प्रसन्न दीपाली फिंगर चिप्स, पेपर नॅपकिन्स आणि रिकाम्या प्लेट्स घेऊन आले. आम्ही घरून आणलेल्या पाववड्याचा डबा उघडला, त्याबरोबर मुलांनी आणलेले चिप्स आणि सॉस होतेच. खाऊन झाल्यावर गरम गरम कॉफी घेऊन आम्ही उठलो. तिथून खालच्या मजल्यावर किचनमध्ये लागणार्‍या वस्तू होत्या. तिथे हॉल डेकोरेशनच्या पण खूप वस्तू होत्या. सुजाता आणि दीपालीचे हे आवडते ठिकाण. खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या, आपल्याकडे न पाहिलेल्या वस्तू इथे होत्या. अर्थातच इथे काही खरेदी होणे भागच होते. खूप सुंदर आणि असंख्य व्हरायटी, वाजवी दर, ईझी टू असेंबल फर्निचर, ह्यामुळे ह्या आयकीया मॉलला खूप गर्दी असते. मुंबईतसुद्धा हे सुरू होणार आहे असे ऐकले आहे. एवढे सगळे बघताना दुपारचे चार कधी वाजले कळले पण नाही.


आयकीयातील किचनवेअर

असेच एका शनिवारी अल्फारेट्टामधल्या हनुमान मंदिरात गेलो होतो. तिथेच बाजूच्या इंडियन हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण केले. प्रसन्नचा एवढ्या लवकर घरी जायचा विचार नव्हता. चला आपण एका मॉलला जाऊ असे म्हणत त्याने गाडी अॅटलांटाच्या दिशेने घेतली. अॅटलांटाजवळच पेरिमिटर मॉल नावाचा एक प्रसिद्ध मॉल आहे. अॅटलांटा हे जुने शहर असल्याने इथे अल्फारेट्टासारखा जमिनीचा सुकाळ नाहीये. त्यामुळे हा मॉल आपल्या फिनिक्स आणि व्हिवियाना मॉलसारखाच होता. दोन तीन मजली उंच बिल्डिंग, त्यात छोटीमोठी सजवलेली दुकाने. इथे अजून काही कन्स्ट्रक्शनची कामे चालू होती. त्यामुळे एक भाग बंद होता. बर्‍याच दुकानांत सेल चालू होते. मॉलमध्ये सुजाता आणि दीपाली एकत्र फिरत होत्या. प्रसन्न आणि माझे इंटरेस्ट वेगळे असल्याने तो मला इतर दुकाने दाखवत होता. मधेच दीपालीचा फोन आला की आम्ही अशा अशा दुकानात आहोत, लगेच या. एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात त्या आमची वाट पहात होत्या. एका प्रसिद्ध कंपनीने नवीन प्रॉडक्ट लाँच केले होते, आणि त्यामुळे ते ५० टक्के डिस्काउंटवर विकत होते. आम्हाला पण लेडिज वर्गासाठी काही गिफ्ट घ्यायच्याच होत्या. त्या दोघींनी काही वस्तू विकत घेण्यासाठी सिलेक्ट करून ठेवल्या होत्या. त्यांच्याकडे पैसे पण होते, फक्त फॉर्मली हो म्हणवून घेण्यासाठी आम्हाला बोलावले इतकेच. पुढे असेच फिरत फिरत, आवडले की खरेदी करत फूडकोर्टजवळ पोचलो. ह्या मॉलपासून जवळच मयूर-जास्वंदीचे घर आहे. मयूरची आई पण थोड्या दिवसांपूर्वी आली होती. दीपालीने ही मंडळी घरी आहेत का विचारून घेतले. मग त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी काही अमेरिकन बिस्किटे घेऊन आम्ही मॉलमधून निघालो. जेवण झालंय, फक्त चहालाच येतोय असे सांगून देखील जास्वंदीने चहाबरोबर बटाटेवडे तयार ठेवले होते. मयूरच्या कम्युनिटीचे नाव लंडन कम्युनिटी. बिल्डिंगचे डिझाईन पण लंडनमधल्या घरांसारखे होते. चार मजली बिल्डिंग, प्रत्येक मजल्यावर खूप सारे फ्लॅट्स, हॉटेलसारखी लांबलचक लॉबी. प्रत्येक मजल्यावर त्या त्या मजल्यावर राहणाऱ्यांचे पार्किंग. प्रत्येक फ्लॅटला छोटी ज्युलियट बाल्कनी. ह्या निमित्ताने एक खूप वेगळ्या प्रकारची कम्युनिटी पहायला मिळाली. भरपूर गप्पाटप्पा झाल्यावर त्यांना घरी यायचे आमंत्रण देऊन आम्ही परतलो.


पेरिमीटर मॉल

हळूहळू आमचे भारतात परतायचे दिवस जसजसे जवळ यायला लागले तसतसे आईबाबांना काय काय दाखवायचे राहिले ह्याचा हिशोब सुरू झाला. आता रोज मधूनमधून पाऊस पण सुरु झाला होता. अॅटलांटाला दोन-तीन वेळा येऊन गेलो. पण अजून आॅलिंपिक स्टेडियम बघायचे राहिले होते. पावसामुळे लांब कुठे जाण्यावर मर्यादा येत होत्या. असेच एका शुक्रवारी अचानक प्रसन्नचा फोन आला की आम्ही लवकर येतोय, आपल्याला अॅटलांटाला जायचंय. स्वच्छ हवा होती, पावसाची चिन्हे कमी होती. आॅफिसमधून मुलं आली, चहा घेतला आणि निघालो. प्रसन्नने अॉलिंपिक स्टेडियमजवळच एका ठिकाणी आॅनलाईन पार्किंग रिझर्व्ह करून ठेवले होते. गाडी पार्क केली आणि चालत चालत स्टेडियमकडे निघालो. स्टेडियमवर पोचलो तर अजिबात गर्दी नव्हती. आत जायला लागलो तर सिक्युरिटीने अडवले, आत सोडायलाच तयार नव्हता. त्याच्याकडे चौकशी केली असता कळले की एक दोन दिवसात इथे अॅटलांटा आॅलिंपिक्सचे विसावे अॅनीव्हर्सरी सेलिब्रेशन होते. मैदानावर सगळी तयारी झालेली दिसत होती. शेवटी तिथल्या सिनीयर अॉफिसरला सांगितले की आम्ही भारतातून एवढ्या लांब हे स्टेडियम बघायला आलोय. ह्या माणसाला भारतीयांबद्दल एक वेगळा विश्वास असावा. ओह यू आर इंडियन असे म्हणून त्याने आम्हाला आत सोडले. पण फक्त ह्याच बाजूने जा असे सांगून त्याच्या आतल्या सहकाऱ्याला आम्हाला आत येऊन द्यायला सांगितले. आतल्या सिक्युरिटीच्या माणसाने आमचा चौघांचा ग्रुप फोटो पण काढला. तिथेच थोडेफार फिरत पुढच्या गेटने बाहेर पडलो. समोरच सीएनएनची बिल्डिंग होती. तसेच चालत चालत पुढे गेलो. जवळच मोठे आणि उंच स्कायव्हील होते. अजून थोडा उजेड होता. अंधार झाल्यावर व्हीलवरून रात्रीचे अॅटलांटा बघावे, आणि तोपर्यंत जेऊन घ्यावे असे ठरले.

ऑलिम्पिक स्टेडियमवर

ऑलिम्पिक ज्योत

ऑलिम्पिक स्टेडियमवर

पुढे गल्लीत एक छान छोटेसे हॉटेल दिसले. आत अजिबात गर्दी नव्हती. एका बाजूला एक निग्रो नवरा बायको काही खाताना दिसत होते. आणि एक छोटा फॅमिली ग्रुप नुकतेच खाणे संपवून निघाला होता. बाहेर रस्त्यावरसुद्धा लोकल निग्रोंचेच साम्राज्य होते. आत गेलो आणि एका काळ्याकभिन्न माणसाने चमकदार दातांच्या स्माईलने स्वागत केले. अगदी अगत्याने आम्हाला मेनू दाखवून काय हवे ह्याची चौकशी केली. आम्ही भारतीय आहोत हे त्याने ओळखले होते. आय लाइक इंडियन फूड, आय लाइक यूवर पकोडा असे आपल्या पदार्थाचे कौतुक पण केले. प्रसन्न दीपालीने वेगवेगळ्या पदार्थांची चौकशी करून आमच्यासाठी व्हेज आणि त्यांच्यासाठी नॉनव्हेज आॅर्डर दिली. आषाढी एकादशी असल्याने मी आणि सुजाताने एक व्हेज फलाफल आणि एक ज्यूस एवढेच घेणे पसंत केले. दोन्हीही खूप चविष्ट होते. अनपेक्षितपणे हॉटेल चांगले निघाल्याबद्दल आम्ही खुश होतो. आता बाहेर चांगला अंधार झाला होता. चालत चालत स्कायव्हीलपाशी आलो. तिथे मोठी रांग लागली होती. अर्ध्याएक तासात आमचा नंबर लागला. आमच्या केबिनमध्ये आम्ही चौघेच होतो. व्हीलच्या ह्या काचेच्या केबिन्स सर्व बाजूंनी बंद आणि एअरकंडिशन्ड होत्या. हळूहळू व्हील वर जायला लागले आणि बाहेरचा नजारा दिसू लागला. व्हीलवरून स्टेडियममधल्या आॅलिंपिक रींग्ज किती मस्त दिसत होत्या. खालचा रस्ता आणि आजूबाजूच्या बिल्डिंग्ज दिव्यांच्या झगमगाटात फारच सुंदर दिसत होत्या. दूरपर्यंतचा अॅटलांटा शहराचा रात्रीचा झगमगाट डोळे दिपवून टाकत होता. स्कायव्हीलच्या तिन वेळा सावकाश चकरा झाल्यावर आम्ही खाली उतरलो. तिथे बाहेर एक छोटी ट्राम जात होती, छानशा बग्गीतून मंडळी फिरत होती. एव्हाना बराच उशीर झाला होता, म्हणून आम्ही घरी परतायचे ठरवले. आजचे अॅटलांटाचे फारच अप्रतिम असे रात्रीचे दर्शन कायम स्मरणात राहील असेच होते.

हॉटेल शवार्मा बाहेर

स्कायव्हीलवरून ऑलिम्पिक रींग्ज

स्कायव्हील

स्कायव्हीलवरून अॅटलांटा दर्शन 

No comments:

Post a Comment