इथे अमेरिकेत आलो तेंव्हा दिवसभर हवा एकदम आल्हाददायक होती. आता हळूहळू दिवसाचे तपमान वाढायला लागले होते. सुरुवातीला मी आणि सुजाता सकाळी ११ च्या सुमारास फिरायला जायचो. पण ऊन एवढे कडक व्हायला लागले की नंतर सकाळचे फिरणे बंद करावे लागले. सकाळी लवकर उजाडून रात्री उशिरा ९ वाजता सूर्यास्त व्हायला लागला होता. त्यामुळे आम्ही संध्याकाळी ६ नंतर फिरणे सुरु केले. प्रसन्नने वॉर्निंग देऊन ठेवली होती की इथल्या उन्हात अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हात जास्त फिरू नका. इथल्या हवेचे काही सांगता येत नाही. आपल्याला वाटते आज हवा मस्त आहे, चला फिरायला जाऊ या. पण थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होते, आणि गपचूप घरात बसून राहावे लागते. त्यामुळे लांबची ट्रिप करायच्या आधी आम्ही मोबाईलवर तिकडचे हवामान बघून जायचे कि नाही हे ठरवायचो. त्यामुळे दोन तीन वेळा स्टोन माउंटन आणि हेलेनची ट्रिप कॅन्सल करावी लागली. असेच एका शनिवारी उद्याचा वेदर रिपोर्ट बघून दुसऱ्या दिवशी जवळचाच एक प्रोग्रॅम ठरवून झोपायला गेलो. सकाळी लवकर उठून पटापट आवरून बाहेर जायला तयार झालो. आणि प्रसन्नने अनाऊन्समेंट केली कि काय होईल ते होऊ दे, आज हेलेनलाच जायचे. वेदर रिपोर्टप्रमाणे तिकडे खूप पाऊस पडणार होता. पण प्रसन्न दीपालीने ठरवलेल्या काही ठिकाणांपैकी हे एक असे होते कि त्यांना आम्हाला तिथे घेऊन जायचेच होते. मग जॅकेट्स आणि छत्र्या बरोबर घेऊन हेलेनसाठी प्रस्थान केले.
संपूर्ण रस्ताभर आज हवा बऱ्यापैकी ढगाळ होती. सूर्यप्रकाश पण होता, पण कडक ऊन नव्हते. त्यामुळे प्रवास एकदम मस्त चालला होता. हमरस्ता संपल्यानंतर तर इतके सुंदर वातावरण होते. पावसाळ्यानंतर महाबळेश्वरहून तापोळ्याला जायचा रस्ता असतो तसा हा खेडेगावातला रस्ता होता. दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी, थोडेसे ढगाळ वातावरण पण आल्हाददायक ऊन, मधूनच छोटी छोटी गावे, तिथे चर्च-कम-स्कुल, शेंगदाणे आणि टोमॅटोची शेती. रस्ता लहान होता, पण कमालीचा स्वच्छ होता. कुठे खड्डे नव्हते. हेलेन जसजसे जवळ येऊ लागले तसतशा मधूनमधून रस्त्याच्या बाजूला राहण्यासाठी केबिन्स दिसू लागल्या. आपल्याकडे जशी फार्महाऊस असतात, तशी इथे केबिन्स मिळतात. सुंदर दोन-तीन खोल्यांची लाकडी घरे, आजूबाजूला पूर्ण जंगलझाडी, जवळपास नदी, केबिनच्या आसपास टेबलावर बाटल्या घेऊन एन्जॉय करण्यासाठी भरपूर मोकळी जागा, असे साधारण ह्या केबीन्सचे स्वरूप होते. मिल्टन पासून दोनेक तासाच्या अंतरावर असलेले हेलेन कधी आले हे ह्या सुंदर रस्त्यामुळे समजले पण नाही.
 |
| हेलेनचे सुंदर दर्शन, गावात प्रवेश करताना |
जॉर्जिया राज्यातल्या व्हाईट कौंटीमधले हेलेन हे एक कंट्री टाऊन, म्हणजे आपल्याकडचे खेडेगाव. दोनेकशे फॅमिलीज, आणि पाचशेच्या आसपास लोकवस्ती असलेले हे सुंदर गांव अॅटलांटाच्या आसपासच्या नागरिकांचे आवडते विकेंड डेस्टिनेशन आहे. गावात प्रवेश करतानाच, हिरव्यागार झाडाझुडुपांत लपलेली छोटी छोटी कौलारू घरे गावाच्या सौंदर्याची चुणूक दाखवत होती. गावात पोचलो तेव्हा पहिले काम पार्किंग. मुख्य रस्त्यापासून अगदी जवळच कार पार्किंग होते. तिथे कोणीही अॅटेंडंट नव्हता. आपली कार पार्क करून स्वतःच पैसे टाकून तिकिट घ्यायचे अशी ही व्यवस्था होती. पूर्वी पुण्यात डेक्कन जिमखान्यावर, पूनम हॉटेलसमोर अशा प्रकारे वर्तमानपत्र विकायला ठेवली होती. समोर कोणीही विक्रेता नाही, शेजारच्या बॉक्स मध्ये पैसे टाका आणि पेपर घेऊन जा. थोड्याच दिवसात गाषा गुंडाळावा लागला होता. असो, प्रसन्नने पाच डॉलर टाकून तिकिट घेतले, आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो. मस्त भुरभुर पाऊस होता, छत्रीची गरज नव्हती. बर्याच फॅमिलीज विकेंडसाठी आल्या होत्या. सगळ्याच घरांच्या आजूबाजूला विविधरंगी फुलझाडे होती. काही रस्त्यांवर बकुळीसारख्या छोट्या पांढर्या फुलांचा सडा पडला होता. त्यामुळे मुळात इतके लहान असलेले हे संपूर्ण गावच रंगीबेरंगी दिसत होते. घरांमध्येच हॉटेल्स आणि दुकाने थाटलेली होती. आमचे सगळ्यांचे मोबाईल कॅमेरे कामाला लागले होते.
 |
| एका घर-कम-हॉटेलबाहेर |
 |
| रंगीत फुलांचे ताटवे |
असेच आरामात चालत चालत वर मेन रोडला आलो. इथली बहुतेक दुकाने आणि हॉटेल्स ही जर्मन ओरिजिनच्या लोकांनी चालवलेली होती. अशाच एका हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. हॉटेलचा काउंटर, किचन, सर्व्हिस सगळे काही फक्त फॅमिली मेंबर्सच बघत होते. मुलांनी गार्लिक ब्रेड बरोबर एका मोठ्ठ्या पिझ्झाची आॅर्डर दिली. मुंबईच्या पिझ्झा एक्स्प्रेसच्या आॅथेंटिक पिझ्झापेक्षा हा कितीतरी भारी होता. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर थोडा वेळ मेन रोडवर फिरलो. जुन्या स्टाईलच्या बग्ग्यांमधून लोकं फिरत होती. गोर्यापान आजीबाई ह्या बग्ग्या हाकत होत्या. पुढे एका काचेच्या वस्तूंच्या दुकानात शिरलो. तिथला कारागीर काचेच्या नळ्या गॅसवर वाकवून वेगवेगळ्या प्रकारची फुले, पक्षी, नावांच्या पाट्या वगैरे तयार करत होता. अंदाजे चाळिशीत असलेला हा इसम त्याच्या आजोबांनी सुरू केलेला हा व्यवसाय पुढे नेत होता. ह्या कलाकाराला दाद द्यायलाच पाहिजे म्हणून काही खरेदी केली आणि बाहेर पडलो. तिथेच एका कोपऱ्यावर एका ग्रुपचा बँड चालू होता, काही पेन्शनर मंडळी बाकड्यांवर बसून निवांत ऐकत टाईमपास करत बसली होती.
 |
| मेन रोडवरच्या फूटपाथवर |
 |
| ह्या दुकानासमोर भारताचा पण झेंडा होता. |
 |
| बग्गी |
आता जवळपास तीन वाजत आले होते. हेलेनपासून जवळच अॅना रुबी फॉल्स नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. ह्याआधी प्रसन्न दीपाली हेलेनला येऊन गेले होते. पण हे अॅना रुबी फॉल्स त्यांनी अजून पाहिले नव्हते. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा आता तिकडे वळवला. चत्ताहूची नॅशनल फॉरेस्टमध्ये कर्टिस क्रिक आणि यॉर्क क्रिक हे अनुक्रमे दिडशे फूट आणि पन्नास फुटांवरून खाली कोसळतात. हे दोन फॉल्स खाली ज्या एका ठिकाणी मिळतात तिथून स्मिथ क्रिक सुरू होतो. हे शेजारी शेजारी जे दोन फॉल्स आहेत, ते अॅना रुबी फॉल्स. हेलेन सोडून आम्ही चत्ताहूची नॅशनल फॉरेस्टमध्ये प्रवेश केला. फॉरेस्ट रोड म्हटल्यावर रस्ता सुंदर असणारच. ह्या नागमोडी रस्त्यावरून आजूबाजूची वनश्री डोळ्यात साठवत पुढे जात राहिलो. दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी आणि उजव्या बाजूला खाली स्मिथ क्रिकचा ओढा. ओढ्याच्या बाजूला कार पार्किंगची सोय होती आणि जवळ कट्टे आणि बाकडी टाकून बसायची व्यवस्था केली होती. बरेचजण हेलेनला न जाता दिवसभर इथेच एंजॉय करतात त्यांच्यासाठी ही खास सोय होती. पुढे रस्त्यावरच एका ठिकाणी पार्किंग फी भरली. तिथल्या माणसाने सांगितले की पाच वाजता फॉल्सची एंट्री बंद होते. त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट फॉल्सला जायच्या ट्रेलजवळ आलो.
ट्रेलजवळ पोचल्यावर दिसले की फॉल्सला जायचा रस्ता हा चांगलाच चढणीचा होता. सकाळपासून खूप चालणे झाल्यामुळे सुजाता चढणे शक्यच नव्हते. फॉरेस्टचे आॅफिस तिथेच होते आणि शेजारीच कँटीन होते. एकदम सुरक्षित जागा होती. त्यामुळे तिला तिथेच कँटीनजवळ बसवले. आम्हाला उतरायला वेळ लागला तर कॉफी आणि स्नॅक्स घे असे सांगून आम्ही पुढे निघालो. चढण बघून मीसुध्दा मुलांना सांगितले की मला जमेल तिथपर्यंतच मी येईन. पण हा रस्ता इतका सुंदर होता की सावकाश सावकाश पुढे चालत राहिलो. एका बाजूला खळाळता स्वच्छ ओढा, आजूबाजूला उंच उंच झाडी, मधूनच ओझरती सूर्यकिरणे, मस्त थंड वातावरण, अजून काय पाहिजे. दीपाली मध्येच थोडे पुढे जाऊन बघायची आणि ओरडून सांगायची बाबा थोडंच राहिलंय, ते पहा तो रस्ता दिसतोय तो शेवटचाच. असे करत करत आम्ही शेवटपर्यंत पोचलो. रस्त्यात एक ऐंशी वर्षाचा तरूण आपल्या पंचाहत्तर वर्षाच्या तरूण सखीची व्हीलचेअर ढकलत ढकलत तिला वर नेत होता. खरं तर हे बघितल्यावर मला माझीच लाज वाटली आणि मी तो रस्ता पूर्ण केला. वर पोचल्यावर ते नयनरम्य दृश्य पाहून शेवटपर्यंत आलो ते किती बरे झाले हे लक्षात आले. सुजाता बरोबर मीपण खाली थांबलो असतो तर एक अतिशय सुंदर नजारा पहायला मुकलो असतो. एका बाजूने कर्टिस क्रिक आणि दुसर्या बाजूने यॉर्क क्रिक खाली कोसळत होते. आजूबाजूला संपूर्ण हिरवीगार वनश्री, सुंदर पावसाळी वातावरण पण पाऊस नाही, सगळेच किती सुंदर होते हे. अप्रतिम, एकदम भारी. प्रसन्नच्या कॅमेर्याला इथे खूप खाऊ मिळाला. सुजाता एकटीच खाली थांबली होती म्हणून फार टाईमपास न करता आम्ही तिथून निघालो.
 |
| फॉल्सला जायचा सुंदर ट्रेल |
 |
| सुंदर वातावरणात दमणे अशक्य |
 |
| रस्त्याच्या बाजूने सुंदर ओढा |
 |
अॅना रुबी फॉल्स.
डावीकडचा कर्टिस क्रिक, उजवीकडचा यॉर्क क्रिक |
 |
| अॅना रुबी फॉल्ससमोर |
आम्ही निघत होतो तेवढ्यात ते वृद्ध दांपत्य इथे पोचले. मानलं त्यांच्या जिगरला. हाश्श हुश्श करत तो गोरापान आणि लालबुंद बाबा घाम पुसत उभा होता. त्याच्या पाठीवर थाप मारून कौतुक करणं तर अनिवार्यच होतं. एक परदेशी माणूस आपलं कौतुक करतोय बघून तो पण जाम खुश झाला. फोटो काढत काढत आम्ही परतलो. मैलभराचे अंतर काटायला वर चढताना आम्हाला अर्धा तास लागला असेल, तेच उतरताना आम्ही दहा मिनिटांत आलो. कँटीनजवळ आलो तर तेथे काही वेगळी जंगली फुले दिसली. अर्थातच माझा मोबाईल मला स्वस्थ बसू देणे शक्य नव्हते. बहुधा ह्या फुलांचे फोटो कोणी काढत नसावे, कारण मला फोटो काढताना बघून एक फॉरेस्ट आॅफिसर जवळ आला आणि त्या फुलांचं वर्णन मला सांगू लागला. त्याचा तो अमेरिकन अॅक्सेंट मला किती समजला माझे मलाच माहीत. ओह, वॉव, ब्युटीफुल हे आपले नेहमीचे शब्द वापरत मी त्याला रामराम केला.
 |
| कॅन्टीनबाहेरचे सुंदर जंगली फुल |
परतताना रस्त्याच्या बाजूला शेंगदाणे आणि सरबतांची स्टॉलवजा दुकाने होती. जीभेनी आवाज दिला आणि प्रसन्नची गाडी तिथे आपोआप थांबली. थोडावेळ उकडलेल्या शेंगा खात टाईमपास केला आणि घरपरतीला लागलो. सकाळी निघतांना पावसाच्या तयारीने निघालो होतो, पण निसर्गाची सुंदर साथ मिळाली आणि संपूर्ण दिवस खूप मजेत गेला. अमेरिकेतील वास्तव्यातील ही एक अतिशय संस्मरणीय ट्रिप होती.
 |
| पीनट स्टॉल |
 |
| असेच गमतीत फोटो पोज |
No comments:
Post a Comment