बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहायला बसलो. अमेरिकेतून आल्यावर बरीच कामे होती, त्यासाठी काही दिवस ठाणे पुणे झाले. त्यानंतर ट्रिपचा फोटो अल्बम तयार केला. मग लक्षात आले की अरे आपला ब्लॉग आहे, अमेरिकेत लिहायला सुरुवात केली होती, पण फिरायच्या नादात लिहायचे राहूनच गेले. आता बसलोय परत लिहायला.
आई बाबा इकडे कधी येताय विचारून विचारून चिरंजीव कंटाळले होते. शेवटी एक दिवस त्यानेच अमेरिकन व्हिसासाठी अॅपॉइण्ट्मेण्ट घेतली. सोमवारची अॅपॉइण्ट्मेण्ट मिळाली होती, आणि गुरुवारी संध्याकाळी त्याने मला तसे सांगितले, मग काय, झाली पळापळ सुरु. त्याने त्याचे पेपर्स पाठवले. व्हिसासाठी काय काय लागते त्याची माहिती सांगणाऱ्या सगळ्या लिंक्स आधी पाठवल्या होत्या, त्या नीट पहिल्या. दोन दिवसात माझे आणि सुजाताचे सगळे पेपर्स शोधून, त्यांच्या झेरॉक्स कॉपीज काढून वेगवेगळे सेट्स तयार केले. आणि रविवारी ठाण्याला गेलो. अमेरिकन एम्बॅसिचे खरेच कौतुक करायला पाहीजे. ९.३० वाजताची अॅपाॅइण्ट्मेण्ट होती, आम्ही काम संपवून १० वाजता ठाण्याला घरी पोचलो पण होतो. सर्व काही एकदम वेळेत आणि शिस्तीत. दुसरी अॅपॉइण्ट्मेण्ट चार दिवासानंतरची होती. तेव्हा पण ८ वाजताची अॅपॉइण्ट्मेण्ट होती. आम्ही ७ वाजता एम्बॅसीबाहेर होतो, बरोबर ८ वाजता आत सोडले. कुठे काही कटकट नाही, थोडे फार प्रश्न विचारून "काँग्रॅच्युलेशन्स, युवर व्हिसा इज अॅप्रुव्हड" म्हणून सोडून दिले. परत ९.३० वाजता घरी. प्रसन्नला तसे कळवल्याबरोबर त्याने लगेच तिकीट पण काढून टाकले आणि ह्या तारखेला माझ्याकडे या असे फर्मान सोडले. आम्हाला काय पुण्यात आपल्या घरी, ठाण्यात मोठ्या मुलाच्या घरी, तसे अमेरिकेत धाकट्या मुलाच्या घरी. पुण्यात पुष्कर विमानतळावर सोडायला आला होता, लुफ्थान्साच्या विमानात बसलो आणि दुसऱ्या दिवशी अमेरिकेत. अॅटलांटाला प्रसन्न आणि दिपाली घ्यायला आलेले. कुठेही काहीही कटकट नाही, आरामात पोचलो.
 |
| पुणे विमानतळावर |
पुण्याच्या विमानतळावर फारशी गर्दी पण नव्हती. बहुधा उड्डाण घेणारे आमचे शेवटचे विमान असावे. कस्टम चेक इन लगेचच झाले. उगाचच बाऊ करून ठेवला होता की खूप कटकट असते. माझे उरलेले पांढरे केस बघून म्हणा, किंवा सुजाताला गुडघे दुखत असल्यामुळे लंगडताना पाहीले म्हणून असेल, बोर्डींगसाठी रांगेत उभे न करता आम्हाला सरळ विमानात बसवले. तशी व्हीलचेअरची सोय प्रसन्नने करून ठेवली होती, पण उगाच कशाला म्हणून आम्ही ती घेण्याचे टाळले. खरं तर व्हील चेअर म्हणजे खूप आजारी असल्यासारखे वाटते, मी हॉस्पिटलला असताना देखील व्हील चेअर नको म्हणत होतो, पण तिथल्या डॉक्टरने ऐकले नव्हते.
पुढे फ्रँकफर्ट विमानतळावर विमान बदलण्यासाठी उतरलो. अबब, केवढा हा विमानतळ, विमानातून उतरल्यापासून बाहेर गेटपर्यंत यायला बसने पंधरा मिनिटे लागली असतील. ह्या गेटपासून पुढच्या बोर्डिंग गेटपर्यंत सुद्धा दहा मिनिटे लागली, तेही लुफ्थान्साच्या कार्टने गेलो म्हणून. तरी टर्मिनल एकच होते. फ्र्ँकफर्ट विमानतळावर पुढची फ्लाईट एका तासातच होती. मग मुकाटपणे व्हीलचेअरची मागणी केली. तिथल्या स्टाफला सांगितले की वेळ कमी आहे लवकर सोडा. पण ते बिनधास्त होते. आम्हाला कुठेही रांगेत उभे न करता, कस्टम चेक इन करून, त्यांच्या कार्टने डायरेक्ट पुढच्या बोर्डिंग गेटजवळ सोडले. केवढा प्रचंड मोठा विमानतळ. विमानतळ म्हणायचा की शॉपिंग मॉल, दोन्ही बाजुंनी झगझगीत दुकाने. बोर्डिंग काउण्टर पण एका कोपऱ्यात. सिनेमाची तिकिटे काढायला असते तशीच आणि तेवढीच रांग, बाकी आजुबाजुला दुकानेच दुकाने. तिथे पण व्हीलचेअरकृपेमुळे रांगेत ऊभे न राहता सरळ बोर्डिंगच्या बसमध्ये बसलो. विमानात बोर्ड होणारे पहिले प्रवासी आम्हीच. नाहीतरी पुण्यापासून अखंड ८-९ तास विमानात बसून पाय आणि गुडघे अस्तित्व दाखवायला लागलेच होते. बरं झालं, रांग वाचली.
पुढचे विमान थोडे मोठे होते. जेवणसुद्धा पहिल्यापेक्षा चांगले होते. पहिल्या विमानात भारतीय आणि जर्मन लोक होते, इथे आमच्यासारखे काही नगण्य सोडले तर सगळेच एकतर लालबुंद गोरे, किंवा पूर्ण काळेकुट्ट, पण स्मार्ट आणि तरतरीत. विमानाचा स्टेटस दाखवणारे स्क्रीन प्रत्येकाच्या समोर होते. एक लांबलचक डुलकी झाल्यावर, पुढचा बराचसा वेळ खाण्यापिण्यात आणि विमान कुठे आहे आणि पोचायला अजून किती वेळ राहीला हे पाहण्यातच गेले.
आणि शेवटी एकदाचे अमेरिकन विमानतळावर उतरलो. विमानात अमेरिकेच्या कस्टमचा एक फॉर्म सगळ्यांना दिला होता. आमचा तो भरून तयार होता. पण इथे अॅटलांटा विमानतळावर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम होती. त्यावरच सर्व माहीती भरून कस्टम चेकईनला गेलो. चार पाच जुजबी प्रश्न विचारून आमच्या पासपोर्टवर एन्ट्रीचा शिक्का बसला आणि आम्ही मोकळे झालो. पुढे ग्रीनबेल्ट मधून सामान चेक करून बाहेर पडलो तो समोर प्रसन्न आणि दिपाली घ्यायला आलेच होते. हुश्श, संपला बाबा एवढा मोठा प्रवास. आम्हाला आणि आमच्या सामानाला त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या गाडीत बसून घरी जायला निघालो.
 |
| प्रसन्नच्या कॅमरीतून |
प्रसन्नच्या गाडीतून विमानतळाबाहेर पडलो. अरे बापरे, केव्हढे मोठे रस्ते, केव्हढे ते फ्लायओव्हर्स. प्रचंड ट्रॅफिक पण अत्यंत शिस्तीत चालला होता. कुठे घुसाघुशी नाही, भसकन ट्रॅक बदलणे नाही, दोन गाड्यांमध्ये भरपूर अंतर. आपल्याकडे एव्हढे अंतर ठेवून गाडी थांबवली तर लगेच दोन रिक्षा आणि चार मोटारसायकली घुसणारच. अॅटलांटा शहराबाहेर आलो तेव्हा पण एव्हढे मोठे रस्ते, आणि दुतर्फा सर्व हिरवेगार. प्रसन्नच्या मिल्टन शहरापर्यंत असेच प्रसन्न रस्ते. हायवे सोडून मिल्टन शहरात शिरल्यावर तर अगदी हिल स्टेशनसारखे वातावरण. शहरातले रस्ते आपल्या एक्स्प्रेसवे एव्हढे. छोट्यातला छोटा रस्ता जंगली महाराज रस्त्याएवढा. दोन्ही बाजूंनी फूटपाथवर वॉकिंग ट्रॅकच्या बाजूला हिरवळ, छोटे छोटे बुशेस, रंगीबिरंगी फुलझाडे. फूटपाथच्या पलीकडे हिरवीगार झाडे, त्याच्या पलीकडे सुंदर बंगलेवजा घरे, ऑफिसेसच्या इमारती किंवा बैठे मॉल्स. मोठे मोठे चौक, सिग्नल न मोडता चालणाऱ्या भारी भारी गाड्या. आणि सिग्नल नसेल तिथे पण अविश्वसनीय शिस्त.
 |
| स्वच्छ आणि सुंदर रस्ते |
 |
| अविश्वसनीय वाहतूक शिस्त |
एका चौकात सिग्नल नव्हता आणि आम्हाला सरळ जायचे होते. पुढची गाडी चौकात थांबली, प्रसन्नने पण मागे गाडी थांबवली. चारही रस्त्यांवर गाड्या थांबल्या होत्या. एका मिनिटात पुढची गाडी रस्ता क्रॉस करून पुढे गेली, आणि प्रसन्नने गाडी थोडी पुढे घेऊन परत थांबवली. मी त्याला म्हणालो, अरे दुसरी गाडी घुसण्याआधी पटकन चल, तो हसला आणि म्हणाला बाबा, इथे असे चालत नाही. आपल्या पुढचा गेला ना, आता बाकी तिन्ही रस्त्यांवरच्या एकएक गाड्या गेल्या कि मग आपण जायचे. आणि खरंच, बाकी रस्त्यांवरच्या एकएकच गाड्या गेल्या, आणि मग आम्ही शिस्तीत आमचा नंबर आल्यावर पुढे गेलो. आपल्या इथे असे थांबलो तर पाठीमागून पॉमपॉम सुरु होईलच, परत लोकं शिव्या पण देतील काय येड्यासारखा गाडी थांबवतोय म्हणून.
आणि शेवटी प्रसन्नचे घर आले. त्याच्या कम्युनिटीच्या गेटमधून त्याने गाडी आत घेतली तेंव्हा समजलेच नाही की आपण एखाद्या रेसिडेन्शल सोसायटीत शिरलोय म्हणून. काय तो एंट्रन्स गेट. गेटच्या बाहेर सुंदर फुलझाडे, डिव्हायडरवर लॉन. आत दोन्ही बाजूंना उंच उंच हिरवीगार झाडे, ती सुद्धा साधारण एकाच उंचीची. थोडे पुढे गेल्यावर कम्युनिटीचा स्विमिंग पूल. त्याच्यानंतर मग एकएक बंगलेवजा घरे सुरु झाली. कम्युनिटीच्या आतल्या रस्त्यांना पण नावे. मेन रोड फ्लेमिंगो रोड, आणि आमच्या घरासमोरचा कॅनरी लेन. प्रत्येक घरासमोर हिरवळ, एकएक छोटे झाड, आणि काही फुलझाडे. सगळे छोटे छोटे दुमजली किंवा तिमजली बंगले. एकही उंच इमारत नाही.
 |
| कम्युनिटी गेटजवळ |
 |
| कम्युनिटीचा स्वतःचा स्विमिंग पूल |
 |
| सुंदर अंतर्गत रस्ता |
 |
| कम्युनिटीतील घरे |
आणि फायनली मोस्ट अवेटेड प्रसन्न-दिपालीच्या घरी पोचलो. गाडीत बसूनच त्याने गॅरेजचे गेट रिमोटने उघडले. आम्हाला हे नविन होते, त्यामुळे नवल आणि कौतुक वाटले. गाडीतून उतरल्यावर बाबा एक मिनिट म्हणून त्याने पटकन आधी घराची सिक्युरिटी सिस्टिम ऑफ केली, आणि मग आम्ही आत गेलो. आत शिरल्या शिरल्या एव्हढ्या मोठ्या प्रवासाचा शीण एकदम गायब झाला. इतके सुंदर आणि आरामशीर घर, त्यात दिपालीने तिचे सगळे कसब लावून नटवलेले. पायातले शूज काढून सुजलेले पाय कुरवाळत त्याच्या गुबगुबीत सोफ्यावर जो टेकलो तो तासभर उठलोच नाही.
प्रवासात भरपूर खाणे झाले होते. पण मनासारखा चहा मिळाला नव्हता. डोळ्यावर झोप पण आली होती. मग दीपालीने मस्त गरम गरम चहा दिला तेंव्हा जरा फ्रेश झालो. मुलांच्या म्हणण्याप्रमाणे जरा लवकरच जेवलो आणि त्यांच्या वेळेप्रमाणे झोपलो तर जेटलॅग लवकर जाईल, म्हणून लगेच झोपलो नाही. आणि चहामुळे थोडी तरतरी पण आली होती. मग जरा आराम झाल्यावर संपूर्ण घर बघितले. सेंट्रलाईज्ड एसी. खालच्या मजल्यावर हॉल, डायनिंग आणि किचन. हॉलचे पडदे उघडले की काचेच्या खिडकीतून बाहेरचे हिरवेगार बॅकयार्ड दिसत होते. डायनिंग रूममध्ये मोठे सागवानी टेबल. मोठा किचन ओटा, मोठा फ्रिज, इलेक्ट्रिक डिश वॉशर, वरच्या मजल्यावर त्यांची बेडरूम, तिथेच एक पिक्चर रूम, जिथे भिंतीवर सगळ्यांचे फोटो लावलेले. स्टडी रूम मध्ये एक टेबल आणि त्यांचा लॅपटॉप. आणि शेवटी आईबाबा ही तुमची रूम म्हणून आमची बेडरूम दाखवली. मोठा बेड आणि त्यावर गुबगुबीत गादी, शेजारी कपाटांच्या ऐवजी क्लोजेट. त्यातच बॅगा ठेवून हँगरला कपडे अडकवायचे, त्यामुळे बेडरूम मोकळी. अटॅचड टॉयलेट वुईथ टब. बेडरूमच्या खिडकीचा पडदा उघडला की समोरची सुंदर घरे आणि त्यासमोरचे हिरवेगार लॉन. अजून काय हवं. पोरगं आईबापाला स्वतःच्या टुमदार बंगल्यात राहायचं सुख देणार होतं.
 |
| प्रसन्न दिपालीचे घर, समोरून |
 |
| घरामागील हिरवळीवर |
 |
| डायनिंग रूम |
 |
| हॉलमधल्या गुबगुबीत सोफ्यावर जस्ट रिलॅक्स |
 |
| पिक्चर रूम |
 |
| ह्या रूम मध्ये माझी नो लुडबूड |
No comments:
Post a Comment